चंद्रपूर -भावाच्या कुटुंबाने जादूटोणा केला म्हणून कॅन्सर झाला, या संशयावरून मोठ्या भावाच्या कुटुंबाला लहान भावाच्या कुटुंबाने मारहाण केल्याची घटना भिवापूर येथे घडली. या प्रकरणात सहा लोकांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र ह्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील वाढत्या अंधश्रद्धेच्या घटनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी अशीच घटना जिवती आणि नागभीड तालुक्यात घडली होती.
अंधश्रद्धेचा पगडा
अतिदुर्गम आणि मागास असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यावर अंधश्रद्धेचा मोठा पगडा आहे. यापूर्वी जिल्ह्यात नरबळीच्या घटनादेखील घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावी जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना भर चौकात मारहाण करण्यात आली. यात वृद्ध महिला आणि पुरुषांचा समावेश होता. ह्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ह्या घटनेची शाई वाळत नाही तोच नागभीड तालुक्यातील मिंडाळा गावात जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेसह तिच्या दोन मुलांना मारहाण करण्यात आली होती. अशीच एक घटना चंद्रपूर शहरातील भिवापूर प्रभागात घडली.