चंद्रपूर : मागील १५ महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचारी, कोविड योद्ध्यांच्या थकीत पगारासाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात डेरा आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलन मागे घेण्यासाठी रामनगर पोलिसांनी पप्पू देशमुख यांना नोटीस बजावली आहे. आंदोलन मागे न घेतल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही नोटीसमधून दिला आहे. पप्पू देशमुख यांचे म्हणणे आहे की, दारूच्या अवैध दुकानांच्या विरोधात जे आंदोलन पुकारले आहे. त्याचा सूड घेण्यासाठी प्रशासन नाहक त्रास देत आहे. मात्र, अशा दबावाला आम्ही अजिबात बळी पडणार नाही. या संदर्भात आपण जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार करणार आहे.
शासकीय नोटीसला विरोध : जिल्ह्यात १ ते १५ जूनपर्यंत जमावबंदी असल्याचे तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व पावसाळ्यामुळे आंदोलनाचा मंडप पडून हानी होण्याची शक्यता असल्याने आंदोलन मागे घ्यावे, असा उल्लेख नोटीसमध्ये नमूद आहे. मात्र, १६ महिन्यांपासून सुरू असलेल्या डेरा आंदोलनाने अनेक वेळा पाऊस आणि वादळाचा अनुभव घेतला आहे. या दरम्यान अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याकरिता जमावबंदीचे आदेश काढले आहेत. एवढेच नव्हे तर मागील जवळपास१० महिन्यांपासून डेरा आंदोलनाचेप्रकरण न्यायप्रविष्ट आहे. नोटीसमध्ये दिलेली सर्व कारणे अनेक महिन्यांपासून लागू असताना आताच पोलीस विभागाने नोटीस कशी बजावली, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला. पोलीस अधीक्षक व दोन पोलीस अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर लेखी तक्रार केल्याने नोटीस पाठवून धमकावण्याचा प्रकार पोलीस अधिकारी करीत आहेत. अशा धमक्या व सूडबुद्धीच्या कारवाईला आपण भीक घालत नाही, अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली.