महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ताडोबाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणा; मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक - ताडोबातील क्षेत्र संचालक कार्यालय

ताडोबातील क्षेत्र संचालक कार्यालयाचे बांधकाम १९१२ मध्‍ये म्‍हणजे ब्रिटीशकालामध्‍ये झालेले आहे. या इमारतीला सुमारे १०९ वर्षे पूर्ण झालेली असल्‍याने वारंवार दुरूस्‍ती करावी लागते. सदर तिन्‍ही कार्यालये एकाच इमारतीत आणल्‍यास प्रशासकीय दृष्‍टया त्‍याचा फायदा होईल. यादृष्‍टीने ताडोबा भवन असे नाव देवून एकत्रित इमारतीचे बांधकाम करणे प्रस्‍तावित आहेत.

मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

By

Published : Oct 24, 2021, 6:34 AM IST

चंद्रपूर - ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाअंतर्गत क्षेत्र संचालक कार्यालय, उपसंचालक कोअर व उपसंचालक बफर ही तिन्‍ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. सदर कार्यालयांना पुरेशी जागा उपलब्‍ध नसुन अतिशय कमी जागेत कामे पार पाडावी लागत आहेत. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून त्याला हवा असलेला निधी अजून प्राप्त झाला नाही. याबाबत राज्याचे माजी वनमंत्री तसेच विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार ह्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत बैठकीत याबाबत चर्चा केली.

ताडोबातील क्षेत्र संचालक कार्यालयाचे बांधकाम १९१२ मध्‍ये म्‍हणजे ब्रिटीशकालामध्‍ये झालेले आहे. या इमारतीला सुमारे १०९ वर्षे पूर्ण झालेली असल्‍याने वारंवार दुरूस्‍ती करावी लागते. सदर तिन्‍ही कार्यालये एकाच इमारतीत आणल्‍यास प्रशासकीय दृष्‍टया त्‍याचा फायदा होईल. यादृष्‍टीने ताडोबा भवन असे नाव देवून एकत्रित इमारतीचे बांधकाम करणे प्रस्‍तावित आहेत. 2019 मध्येच यासंदर्भात मंजूरी देण्यात आली होती. परंतु निधीअभावी काम रखडले आहे. यासाठी १८ कोटीच्या निधी मागणीचा प्रस्‍ताव शासनाला सादर करण्‍यात आला आहे. यासाठी त्‍वरीत निधी मंजूर करण्‍यात यावा व ताडोबा भवनाचे बांधकाम जलदगतीने करण्‍यात यावे, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केली.

बांबु फुलोरा व्‍यवस्‍थापनासाठी अनुदान उपलब्‍ध करावे

यावेळी ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाशी संबंधित काही मागण्‍या त्‍यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केल्‍या. यावेळी त्यांनी बांबूच्या उत्पादनाबाबत चर्चा केली. ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पातील कोअर व बफर क्षेत्रात सन २०१८
पासून बांबुला फुलोरा येण्‍यास सुरूवात झाली आहे. त्‍यामुळे पुढील एक ते दोन वर्षात बांबुला फार मोठया प्रमाणात फुलोरा येण्‍याची शक्‍यता आहे. यास उपाययोजना म्‍हणून सेवक संस्‍थेमार्फत विस्‍तृत सर्वसमावेशन नियोजन आराखडा तयार करण्‍यात आलेला आहे. यासाठी ६९ कोटीचा बांबु फुलोरा व्‍यवस्‍थापन योजना आराखडा तयार करून मंजूरी व अनुदानाकरिता सादर करण्‍यात आलेला आहे. यासाठी २०२१-२०२२ करिता २१ कोटीची मागणी
करण्‍यात आली होती. त्‍यापैकी प्रथम टप्‍प्‍यात 11 कोटींचे अनुदान प्राप्‍त झालेले आहेत. उर्वरित अनुदान त्‍वरीत मिळणे आवश्‍यक आहे. या आराखड्यामध्‍ये प्रामुख्‍याने बांबु कुपांची कामे, रस्‍त्‍यालगत असलेल्‍या अग्‍निसंरक्षण रेषेचा विस्‍तार करणे, पुननिर्मीतीकरिता बांबु बिया गोळा करून सीडबॉल तयार करणे, अग्‍नीसंरक्षण उपकरणे खरेदी करणे, गस्तीकरिता वाहन खरेदी करणे आदी बाबींचा समावेश असुन यासाठी तातडीने आवश्‍यक अनुदान उपलब्‍ध करून देण्‍याची मागणी मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

व्‍याघ्र सफारी व वन्‍यजीव केंद्र निर्माण करण्‍याबाबत

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पातील पर्यटनाचा ताण कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने चंद्रपूर येथे चंद्रपूर-मुल राष्‍ट्रीय महामार्गालगत वन प्रबोधिनीच्‍या बाजूला असलेल्‍या चंद्रपूर प्रादेशिक वनविभागातील वनखंड क्रमांक ४०२ व ४०३ मध्‍ये व्‍याघ्र सफारी निर्माण करण्‍याच्‍या दृष्‍टीने जागेची निवड करण्‍यात आलेली आहे. याच परिसरात वन्‍यजीव बचाव केंद्र प्रस्‍तावित असल्‍याने दोन्‍ही प्रकल्‍पाला एकमेकांना पुरक अशी व्‍यवस्‍था निर्माण होईल. सदर जागेवर व्‍याघ्र सफारी व वन्‍यजीव बचाव केंद्र निर्माण करण्‍याकरिता प्रस्‍ताव तयार करण्‍यात आला असून सेंट्रल झू अॅथॉरिटीकडे मंजूरीसाठी सादर करण्‍यात आला आहे. या प्रस्‍तावाला मंजूरी मिळण्‍याबाबत राज्‍य शासनाने प्रभावी पाठपुरावा करण्‍याची मागणी मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details