चंद्रपूर Sudhir Mungantiwar on SC Hearing : आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं असता, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना न्यायालयानं चांगलंच फटकारलं आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया दिलीय. न्यायालयाचा तो अधिकार आहे, तसंच न्यायालयानं ज्या सूचना दिल्या आहेत त्याचं पालन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करतील. मात्र, जेव्हा हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडं गेलं तेव्हा नार्वेकर हे देखील न्यायाधीशच होते, असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी राहूल नार्वेकरांची पाठराखण केली आहे.
अनेक खटले प्रलंबित आहेत ते निकाली काढा : सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारताना काही गोष्टीचा विचार करावा. सर्वोच्च न्यायालयात अनेक खटले प्रलंबित आहेत, ते लवकरात लवकर निकाली काढायला पाहिजे. राम मंदिराचा प्रश्न देखील न्यायालयानं इतकी वर्षे अडकवून ठेवला, असंही सुधीर मुनगंटीवारांनी यांनी यावेळी स्पष्ट केलं. राहुल नार्वेकर यांना फटकारल्याबाबत त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर काहीशी नाराजी व्यक्त केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करुन सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात परतले. यावेळी त्यांचं ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.