चंद्रपूर- सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या विषयावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्यपालांच्या भेटीला अनेक नेते जात असल्याने या चर्चेला आणखी पेव फुटला आहे. मात्र, राज्याचे बहुजन विकास मंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि राज्याचे माजी अर्थमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या गोष्टीचे एकमताने खंडन केले आहे. राष्ट्रपती राजवटीची चर्चा ही केवळ प्रसार माध्यमांमध्ये होत आहे. प्रत्यक्षात असे काहीही नाही आणि तसे होण्याची शक्यताही नाही, असे म्हटलं आहे.
मुनगंटीवार म्हणाले, 'आज सर्वत्र कोव्हिडचा कहर होत आहे. अशावेळी योग्य उपाययोजना करण्याच्या चिंतेने राज्यपालांची भेट घेणे स्वाभाविक आहे. राज्यपालांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते. याचे स्पष्टीकरण देण्यासाठी खासदार संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला गेले असावेत. शरद पवार हे कोरोनाच्या विषयावर राज्यपालांच्या भेटीला गेले असतील. तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवटीची केलेली मागणी ही त्यांची वैयक्तिक मागणी आहे. ते स्वतः मुख्यमंत्री राहिलेले आहेत. याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. सध्याची राज्याची तसेच मुंबईची स्थिती ही चिंताजनक आहे. या चिंतेच्या भावनेने त्यांनी ही मागणी केली असावी. निवडणूक झाली आहे. सरकार स्थापन झाले आहे. कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. अशा वेळी एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रपती राजवटीसाठी आम्ही प्रयत्न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.'
तर वडेट्टीवार यांनी ही स्थिती केवळ महाराष्ट्राची नसून संपूर्ण देशाची आहे. अशावेळी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल उपस्थित केला आहे. कोरोनाचे संकट हे महाविकासआघाडी सरकारने आणले नाही. उलट गुजरातमध्ये कोरोनाची गंभीर स्थिती आहे. या स्थितीवर गुजरात उच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मग अशावेळी गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत विचार व्हावा. महाविकास आघाडी या संकटावर मात करण्यासाठी सक्षम आहे. तिनही पक्ष मिळून राज्यात चांगली परिस्थिती हाताळत आहेत. आमच्याकडे सक्षम संख्याबळ आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीच्या चर्चेला काही अर्थ नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर काही तासांमध्येच नारायण राणे यांनीही राजभवनात कोश्यारी यांची भेट घेतली. याआधी शिवसेनेचे नेत संजय राऊत यांनी भेट घेतली होती. यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे.