चंद्रपूर :अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेंन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. या संपाला शिक्षक संघटनांनीसुद्धा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील लाडबोरी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संपात सहभागी झालेत. मागील तीन दिवसांपासून शिक्षक नसल्याने विद्यार्थी शाळेत जातात. मात्र शिक्षक संपावर असल्याने विद्यार्थ्यांना तसेच वापस परतावे लागत आहे. या प्रकारामुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आज चिमूर-सिंदेवाही या मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
रास्ता रोको आंदोलन :त्यानंतर सिंदेवाही पोलिसांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन देत विद्यार्थ्यांना शाळेत परत पाठविले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. लाडबोरी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. पहिली ते सातवीचे वर्ग असून, पाच शिक्षक नियुक्त आहेत. परीक्षा जवळ आली असूनही अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यात संपामुळे मागील तीन दिवसांपासून एकही शिक्षक शाळेत हजर नाही. त्यामुळे विद्यार्थी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत येतात. सायंकाळी पुन्हा परत घरी जातात. या काळात विद्यार्थ्यांना दुपारी देण्यात येणारी खिचडीचे वाटपही करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सिंदेवाही-चिमूर या मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आंदोलनाची माहिती मिळताच सिंदेवाहीचे सहायक पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण हे पोलिस पथकासह लाडबोरी गावात दाखल झाले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची समजूत काढली. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून समाधानकारक तोडगा काढू, असे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.