चंद्रपूरमध्ये धावणार लालपरी; 50 टक्के प्रवाशांनाच परवानगी - chandrapur st bus
जिल्हा अंतर्गत प्रवासाकरिता बस सेवा किमान 50 टक्के प्रवासी क्षमतेसह आजपासून सुरू करण्यात आली आहे. ही बस सेवा संपूर्ण जिल्हयामध्ये सुरू करण्यात आली आहे.
चंद्रपूर - लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच लालपरी रस्त्यावर धावणार आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली असून, आजपासून जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू होणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे. ही बससेवा 31 मे पर्यंत सुरू असलेल्या टाळेबंदी पर्यंत असेल. सायंकाळी 7 ते सकाळी 7 दरम्यान ही बससेवा बंद असणार आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र व राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे लॉकडाऊन असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 31 मेपर्यंत जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कायम राहणार आहे. परंतु, जिल्हांतर्गत प्रवास करण्यासाठी आता परवानगीची मुभा देण्यात आली आहे. या सोबतच जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत खासगी वाहतुकीसह आता सार्वजनिक वाहतुकीमध्ये बस सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हा अंतर्गत प्रवासाकरिता बस सेवा किमान 50 टक्के प्रवासी क्षमतेसह आजपासून सुरू करण्यात आली आहे. ही बस सेवा संपूर्ण जिल्हयामध्ये सुरू करण्यात आली आहे. बस प्रवास करीत असताना सामाजिक अंतर ठेवून आणि निर्जंतुकीकरण करूनच प्रवास करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.