चंद्रपूर - संपत्तीचा वाद किती शिगेला पोचतो, ही बाब एका धक्कादायक घटनेतून समोर आली आहे. संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना अजयपूर येथे घडली आहे. सुरेश नवघडे असे मृत वडिलांचे नाव आहे, तर राजकुमार नवघडे असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी बल्लारपूर येथून अटक केली आहे.
चंद्रपूर : संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलानेच केली वडिलाची हत्या - बल्लारपूर
संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलानेच आपल्या वडिलाचा खून केल्याची घटना अजयपूर येथे घडली आहे. राजकुमार नवघडे असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी राजकुमार नवघडे हा आपले वडील सुरेश नवघडे यांच्यापासून विभक्त राहत होता. आपल्या वडीलाने त्यांची संपत्ती आपल्या नावावर करावी अशी त्याची इच्छा होती. या इच्छेला त्याच्या आईचाही पाठिंबा होता. त्यामुळे सुरेश यांची पत्नी ही त्यांच्या मुलासोबत राहत होती. आज मुलगा आणि वडिलांमध्ये भांडण झाले. हे भांडण नंतर विकोपाला गेले. त्यात मुलगा राजकुमार याने त्याचे वडील सुरेश नवघडे यांना जबर मारहाण केली. या घटनेनंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना चंद्रपुरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर राजकुमार फरार झाला होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बल्लारपूर येथून अटक केली. याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे.