चंद्रपूर - डिजिटल इंडियाच्या युगात गोंडपिपरी तालुक्यातील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तालुक्यातील नांदगाव, हेटी नांदगाव, टोले नांदगाव या गावातील महिलांना हा प्रवास करून वाळूचा उपसा करावा लागतो, हाताने खोल खड्डा केल्यावर वरचे पाणी त्यांना गोळा करावे लागते. याच त्रासामुळे गावातील तरुणांची लग्न होण्यास मोठी समस्या निर्माण होत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव, हेटी नांदगाव, टोले नांदगाव या गावातील ही भीषण समस्या आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत नळाद्वारे सात गावातील नागरिकांना घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षितपणामुळे कधी दूषित पाणी पुरवठा होतो, तर कधी कधी पंधरा पंधरा दिवस पाणी बंद असते. अशा वेळेस येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी लगतच्या नाल्यातील पाणी (चुहा) उपसा करून आणावे लागत आहे. पाण्याची ही गंभीर समस्या फक्त उन्हाळ्यातच नाही तर बाराही महिने असते. सोशल मीडियावर अनेकदा याबाबत बातम्या प्रकाशित करण्यात आल्या, मात्र प्रशासन यावर उपाययोजना करण्यासाठी समोर येत नसल्याचे चित्र आहे.
मूलभूत अधिकाराचे उल्लंघन -भारतीय राज्यघटना कलम 21 - अ मध्ये नमुद मूलभूत अधिकारात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. असे असतानाही प्रशासनाकडून मात्र या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. एकंदरीत नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केल्या जात आहे.