चंद्रपूर - जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रापैकी तीन विधानसभा क्षेत्रावर शिवसेनेने आपली दावेदारी प्रस्तुत केली. यामध्ये राजुरा, ब्रह्मपुरी आणि वरोरा विधानसभेचा समावेश आहे, अशी माहिती संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी दिली आहे. यामुळे युतीच्या वाटाघाटीत आणखीन अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संपर्कप्रमुख कदम यांची प्रतिक्रिया राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, युतीचा तिडा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे युती होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण कायम आहेत. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रावर शिवसेनेने आपली दावेदारी प्रस्तुत केल्याने या युतीच्या तिढ्यात आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेने राजुरा, ब्रह्मपुरी, आणि वरोरा या तीन विधानसभा जागांवर आपला दावा ठोकला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वरोरा विधानसभा क्षेत्रातून सेनेचे बाळू धानोरकर यांनी भाजपचे उमेदवार आणि माजी मंत्री संजय देवतळे यांना पराभूत केले होते. यानंतर धानोरकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. यापूर्वी येथे सेनेचे आमदार असल्याने ही जागा सेनेचीच आहे, असे सेनेचे म्हणणे आहे. तर राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार भाजपचे अॅड. संजय धोटे आहेत. मात्र, त्यांच्या जागी आता सेनेला संधी द्यावी, अशी सेनेची मागणी आहे. तसेच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून वडेट्टीवार यांच्या विरोधात असलेले भाजपचे उमेदवार अतुल देशकर हे पराभूत झाले होते. येथेही सेनेची हीच मागणी आहे. युतीच्या चर्चेत भाजपने सेनेचा आमदार असलेल्या जागेवरही दावा ठोकला आहे. त्यामुळेच आम्हीही आता सेनेची ताकद जिथे आहे, तिथे दावा ठोकत आहोत. असे विधानसभा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख संदीप गीऱ्हे, प्रमोद पाटील तसेच सेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.