चंद्रपूर - दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरातील मोठ्या कोळसा व्यापाऱ्यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. कोळसा व्यापारात मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. या व्यापाऱ्यांच्या घरासमोर रविवारी शिवसेनेने आंदोलन केले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कोळसा व्यापाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
अवैध कोळसा तस्करीप्रकरणी व्यापाऱ्यांच्या अटकेसाठी शिवसैनिकांचे आंदोलन - चंद्रपूर
शहरातीत कोळसा व्यापारात मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने कोळसा व्यापाऱ्यांच्या घरी छापा टाकला होता. याप्रकरणी सखोल चौकशी करून व्यापाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत शिवसैनिकांनी रविवारी कोळसा व्यापाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन केले.
चंद्रपूर शहराच्या सभोवताल वेकोलीच्या कोळसा खाणी आहेत. त्यातून दररोज लाखो टन कोळसा काढला जातो. या कोळशाची काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. यासाठी कोळसा व्यापाऱ्यांची एक टोळी सक्रिय असून यातून शेकडो कोटी कमविले जातात. याच प्रकरणी 11 जुलैला शहरातील कोळसा व्यापाऱ्यांच्या घरी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. यामध्ये श्याम मित्तल, रणजित छाबडा, नितीन उपरे, संदीप अग्रवाल यांचा समावेश होता. हे सर्व स्वामी फ्युएल कंपनीचे संचालक आहेत.
विशेष म्हणजे प्राप्तिकर विभागाची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. त्यामुळे यात काही ठोस पुरावे मिळाल्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी ही मागणी घेऊन रविवारी शिवसेनेच्या वतीने स्नेहनगर येथील कोळसा व्यापाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करत या व्यापाऱ्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात राजेश नायडू, सतीश भिवगडे, मनोज पाल, जयदीप रोडे, सुरेश पचारे यांचा सहभाग होता.