चंद्रपूर -कोरोनाच्या काळात सर्व शाळा बंद असल्याने सर्वांनी आता ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गाला हा प्रकार परवडणारा आहे. मात्र, रोजंदारी, मजुरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन असण्याची शक्यता नाहीच्या बरोबरच आहे. याकरिता चंद्रपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे.
'शिक्षक आपल्या दारी' हा अभिनव उपक्रम मनपाच्या शिक्षण विभागाने सुरू केला आहे. इतर शाळा आणि कॉन्व्हेंटप्रमाणे मनपाच्या शिक्षण विभागाने देखील ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू केले. यासाठी अँड्रॉईड फोन लागतो. मात्र, मोलमजुरी करणाऱ्या पालकांना दोन वेळच्या जेवणासाठीचा संघर्ष करावा लागतो. अशावेळी त्यांनी स्मार्टफोन आणायचा कुठून हा प्रश्न पालकांसोबतच मनपालाही पडला. केवळ 10 टक्के पालकांकडेच स्मार्टफोन होता. त्यातही घरी एकच फोन असल्यामुळे त्यांना तो आपल्यासोबत कामावर घेऊन जावा लागायचा. यावर मनपाचे शिक्षणाधिकारी नागेश नीत यांना अभिनव कल्पना सुचली.
विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवणी द्यायची आणि एक आठवड्याचा गृहपाठ द्यायचा असा हा उपक्रम आहे. या उपक्रमाला महापौर राखी कांचर्लावार आणि आयुक्त राजेश मोहिते यांनी लगेच पाठिंबा दिला. त्यानुसार आता 'शिक्षक आपल्या दारी' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याला पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.