चंद्रपूर - जिल्ह्याच्या चिमूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अडेगाव (देश) येथील संघपाल केवड गजभीये (वय ३३ वर्ष) याचे शुक्रवारी सकाळी पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर संघपाल ७ महिन्याची मुलगी रुहाणीला घेऊन गावाशेजारच्या शेतावर गेला. दरम्यान, पाणी काढत असताना चिमुकली विहिरीत पडली. तिला वाचवण्यासाठी वाडीलानेही उडी घेतली. यामध्ये सात महिन्याची चिमुकली रुहाणी हिचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली.
पती पत्नीच्या भांडणात चिमुकलीचा मृत्यू; पित्याला अटक - कौटुंबिक कलह
रुहाणीची आई सरीता हिच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून संघपाल गजभीयेला ताब्यात घेण्यात आले.
अडेगाव (देश) येथील रहिवासी असलेले संघपाल गजभिये याचे पत्नीसोबत चारित्र्याच्या संशयावरून नेहमी वाद व्हायचे. शुक्रवारी सकाळीसुद्धा या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात संघपाल ७ महिन्याची चिमुकली रुहाणीला घेऊन निघून गेला. पत्नीही गावातील तंटामुक्त समितीकडे गेली. मात्र, तंटामुक्त समितीचे कुणीही भेटले नाही. याचदरम्यान पती मुलीला घेऊन भास्कर बदके यांच्या शेतातील विहिरीत पडल्याची माहीती होताच गावकऱ्यांनीही विहीरीकडे धाव घेतली. मात्र, चिमुकल्या रुहाणीला वाचवता आले नाही.
घटनेची माहीती चिमूर पोलीस विभागाला होताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. रुहाणीची आई सरीता हिच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून संघपाल गजभीये याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास चिमूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे करीत आहेत .