चंद्रपूर -चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात ( Chandrapur Coal Power Station ) केवळ सात दिवस पुरेल इतकाच कोळसा ( Coal Shortage In Chandrapur ) शिल्लक आहे. आधीपेक्षा ही स्थिती बरी असली तरी पावसाळ्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. अचानक विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याने आणि कोळसा पुरवठा कमी होत असल्याने याचा फटका वीज उत्पादनावर होत आहे.
कोळशाचे भाव वाढले -चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे राज्यातील सर्वात मोठे वीज केंद्र आहे. या केंद्रातून 2 हजार 450 मेगावॉट इतके विजेचे उत्पादन होते. यासाठी सात विजेचे संच सज्ज आहेत. यासाठी दररोज सरासरी 45 हजार टन इतका कोळसा लागतो. हा कोळसा दुर्गापूर, पद्मापूर आणि इतर कोळसा खाणीतून येतो. मात्र, सध्या कोळशाचे भाव वाढले आहेत. त्यातही पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक औष्णिक वीज केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर निर्माण झाले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कोळसाचा जेव्हढा साठा एरव्ही असतो, त्या तुलनेने अत्यल्प आहे. सध्या सात दिवस पुरेल इतकाच कोळसा वीज केंद्रात उपलब्ध आहे.
पद्मापूर कोळसा खाणीतून आवक बंद -पद्मापूर कोळसा खाणीचे उत्पादन अनिश्चित काळासाठी ठप्प झाले आहे. दररोज येथून वीज केंद्रात तीन ते चार हजार टन कोळसा यायचा. मात्र, ही आवक आता बंद झाल्याने याची तूट इतर ठिकाणाहून भरून काढली जात आहे. माजरी, भटाळी, घुगूस आणि क्षेत्रातील कोळसा येथे येत आहे. पावसाळ्यात जमिनीत पाणी मुरल्याने कोळसा उत्पादन बंद असते. अशावेळी वीज उत्पादनाला फटका बसू नये म्हणून एक ते दीड महिन्याचा कोळसा साठा आधीच उपलब्ध करून ठेवल्या जातो. मात्र, यावेळी केवळ सात दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. कोरोनाचा काळ संपल्याने, अनेक उद्योग सुरू झाल्याने अचानक वीज मागणीत भर पडली. त्यातही उन्हाळा असल्याने साहजिकच ही मागणी वाढलेली असते. मात्र, त्यानुसार कोळसा उपलब्ध होत नसल्याने हे संकट निर्माण झाले आहे. याबाबत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वीज उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू असून मुबलक प्रमाणात कोळसा उपलब्ध आहे. सातही संच पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. कोळशाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी व्यवस्थापन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा -Rana VS Shivsena : मातोश्रीवर उद्या 9 वाजता हनुमान चालीसाचे पठण करणारच; रवी राणांचा निर्धार