चंद्रपूर - राज्यात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. लोकशाही बळकट करण्याकरता समाजातील प्रत्येक घटकाने मतदानात सहभाग घेणे गरजेचे आहे. यासाठी निवडणूक विभागातर्फे जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. चिमूर विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती करण्यासाठी बस स्थानक आणि तहसील कार्यालयाच्या परिसरात सेल्फी पॉईंट तयार केले आहेत. या सेल्फी पॉईंटला नागरीकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे 'मी मतदान करणार' असा संदेश असलेले सेल्फी पॉईंट तयार केले आहेत. या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन चिमूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचे हस्ते करण्यात आले. सेल्फी पॉईंटवर फोटो काढून व्हॉट्सअॅप गृपवर एकमेकांना मतदान करण्याकरता संदेश पाठवले जात आहेत. मतदारांना जागृत करण्याच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.