चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थीती उद्भवू नये, यादृष्टीने पूर्व तयारी म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग तात्पुरते स्वरुपात, 5 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीकरीता बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शाळा बंद असली तरी जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग ऑनलाईन सुरु राहतील. तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे वर्ग कोविड-19 च्या सर्व सुरक्षा विषयक नियमांचे पालन करुन पुर्वीप्रमाणेच सुरु राहतील. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नियमितपणे व आवश्यकतेनुसार शाळेत उपस्थित राहतील. शिक्षक शाळेत येऊन ऑनलाईन वर्ग घेतील. तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेकरीता शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार काम करतील.