चंद्रपूर -किशोरजोरगेवारांनी आमदार होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांना मास्क वाटून प्रदूषणाचा निषेध केला होता. तेच विद्यार्थी आता रस्त्यावर मास्क बांधून सत्याग्रह करत आहेत. शहराचे प्रदूषण कमी व्हावे, ही साधी आणि माफक मागणी त्यांची आहे. दोन महिन्यांपासून दर आठवड्यात ही मुले शाळा सोडून ठिय्या आंदोलन करीत आहेत. मात्र, आमदार झालेल्या जोरगेवार यांनी या मुलांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेण्याची तसदी घेतलेली नाही. मग दोन वर्षांपूर्वी जोरगेवार यांनी केलेले आंदोलन हा केवळ राजकीय स्टंट होता का? नसेल तर आमदार झाल्यानंतर त्यांनी प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी नेमकी काय पाऊले उचलली, विधानसभेत हा विषय कितीदा मांडला? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
चंद्रपुरात प्रदूषण ही एक भीषण समस्या बनली आहे. 'औद्योगिकनगरी' असा उल्लेख होण्यासाठी चंद्रपूरकरांनी याची मोठी किंमत चुकविली आहे. धूळ, वेगवेगळे विषारी वायू, उष्णतेचा उच्चांक यामुळे सामान्य चंद्रपूरकर बेजार झाला आहे. त्यात विकासकामांच्या नावाने होणारी धूळफेक वेगळी. त्यामुळे प्रदूषणातून सुटका नाहीच. अनेक पिढ्या यात मार्गी निघाल्या आहेत. पण पुढच्या पिढीचे काय? त्यांनाही श्वसनाचे विविध आजार, हृदयरोग, डोळ्याचे विविध आजार त्यांनाही आपण हेच देणार का? हा प्रश्न सामान्य नागरिकांपेक्षा मुलांनाच जास्त पडला आहे. म्हणून या मुलांनी ब्रिटनची पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिने सुरू केलेल्या 'फ्रायडे फॉर फ्युचर' या मोहिमेत सहभागी होत, प्रदूषणाच्या विरोधात आंदोलन करण्याचे ठरविले. फिमेल एज्युकेशन सोसायटीच्या शाळकरी मुलींकडून याची सुरुवात झाली.
हेही वाचा -कोरेगाव-भीमा प्रकरण : 'सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा केंद्र सरकारला अधिकार'
मागील दोन महिन्यांपासून हे चिमुकले दर शुक्रवारी शहराच्या मध्यवर्ती भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला बसून सत्याग्रह करत आहेत. याची दखल वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली. त्यांनी या मुलांचे म्हणणे ऐकून घेतले. एवढेच नव्हे तर ही समस्या त्यांनी विधानसभेच्या पटलावर ठेवली. त्यांचे पती आणि जिल्ह्याचे खासदार बाळू धानोरकर यांनीसुद्धा संसदेत चंद्रपूर शहराचे प्रदूषण कमी करण्याची आग्रही मागणी केली. मात्र, जोरगेवार यांनी अद्याप या मुलांची भेट घेतलेली नाही.
हेही वाचा -'येथे' लखलखत्या निखाऱ्यांवरून भक्त चालतात अनवाणी