चंद्रपूर - उत्तर प्रदेशातील हाथरसमधील दलित तरुणीवरील अत्याचाराचे वास्तव दडवू पाहणाऱ्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारला विरोधी पक्ष, माध्यमे आणि जनतेच्या दबावासमोर अखेर झुकावे लागले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या गावामध्ये जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यूपी पोलिसांच्या चौकशीवर कुणीच समाधानी नाही, त्यामुळे हाथरस प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावा. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेदेखील एक दलितच आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.
हाथरस प्रकरणात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा; चंद्रपुरात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन - chandrpur congress agitation
हाथरस प्रकरणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी चंद्रपूर शहर काँग्रसने केली आहे. या मागणीसाठी आज (सोमवारी) काँग्रेसने सत्याग्रह आंदोलन केले.
हाथरस येथील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याकरिता शहर काँग्रेसतर्फे गांधी चौक येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.चंद्रपूर शहर काँगेस अध्यक्ष रामू तिवारी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि चीड आणणारी आहे. या घटनेकडे योगी सरकार आणि समाजातील तथाकथित लोक मूग गिळून गप्प आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा परिषद सदस्य ममता डुकरे, अल्पसंख्यक विभाग प्रदेश महासचिव मलिक शाकीर, महाराष्ट अनुसूचित जाती उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल आदी उपस्थित होते.