चंद्रपूर -वन्यप्राणी आणि मानवांचा संघर्ष टाळण्यासाठी वाघांच्या स्थानंतराचा प्रस्तावावर अभ्यास सुरू असून या विषयाचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. येत्या काळात ज्या क्षेत्रात वाघांची संख्या जास्त आहे, त्या भागांतील वाघ राज्याच्या इतर जंगलात स्थानांतरित करण्यासंदर्भांत हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या विषयावर प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर वाघांना स्थलांतर करता येईल का, याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सकारात्मक अहवाल दिल्यास कॅबिनेटमध्ये प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.