महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कामगारांच्या संयमाचा अंत पाहू नका; थकीत वेतनासाठी मेडिकल कॉलेजवर हल्लाबोल आंदोलन

गेल्या महिन्यापासून अनेक तडजोडी शासन, प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. मात्र, त्याचा कुठलाही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या कामगारांनी हल्लाबोल आंदोलनाचा इशारा यापूर्वी दिला होता. त्यानुसार, अनेक महिला सफाई कामगार पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात धडकल्या. येथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.

Chandrapur sanitary labor protest News
चंद्रपूर सफाई कामगार आंदोलन न्यूज

By

Published : Mar 5, 2021, 7:24 PM IST

चंद्रपूर - सात महिन्यांच्या थकीत वेतनासाठी मागील एका महिन्यापासून ठिय्या आंदोलन करणाऱ्या सफाई कामगारांनी आजअखेर चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हल्लाबोल आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. महिला सफाई कामगार यात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी तैनात पोलीस कर्मचारी आणि कामगारांमध्ये झटापट झाली. ज्यात महाविद्यालयातील कार्यालयाच्या काही काचा देखील फुटल्या. यानंतर पप्पू देशमुख आणि पोलिसांनी संतप्त कामगारांची समजूत घातल्याने पुढील अनर्थ टळला. या आंदोलनात या सफाई कामगारांच्या मनात असलेला उद्रेक समोर आला.

चंद्रपूर : सफाई कामगार आंदोलन

कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन

कोरोनाच्या काळात ज्यांनी अविरत काम केले, त्या सफाई कामगारांना मागील सात महिन्यांचे वेतन अजून मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला. वारंवार मागणी करूनदेखील चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने या कामगारांचे थकीत वेतन त्यांना दिले नाही. त्यामुळे अखेर या सफाई कामगारांनी डेरा आंदोलन पुकारले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या सर्व कामगारांनी सहकुटुंब ठाण मांडले. येथेच स्वयंपाक तयार करून जेवण करू. मात्र, जोवर वेतन मिळणार नाही, तोवर इथून हलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.

आम्ही जगावं की मरावं? कामगारांचा संतप्त सवाल

गेल्या महिन्यापासून अनेक तडजोडी शासन, प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. मात्र, त्याचा कुठलाही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या कामगारांनी हल्लाबोल आंदोलनाचा इशारा यापूर्वी दिला होता. त्यानुसार, अनेक महिला सफाई कामगार पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात धडकल्या. याची पूर्वकल्पना असल्याने पोलिसांची देखील तैनाती येथे करण्यात आली होती. मात्र, हा मोर्चा थेट महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हुमणे यांच्या कार्यालयाकडे वळला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली आणि या झटापटीत कार्यालयाच्या काही काचादेखील फुटल्या. यावर महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'आम्ही जगावं की मरावं' हा प्रश्न आमच्यासमोर आहे. मागील सात महिन्यांपासून आमच्या घराची चूल पेटली नाही. आता आम्हाला आमच्या मुलाबाळांसोबत रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागतो आहे. ह्याच रस्त्यावरुन अनेक अधिकारी, नेते जातात. त्यांना आमच्याकडे ढुंकूनही बघण्यासाठी वेळ नाही. आम्हाला सन्मानाने आमचे पोट भरण्यासाठी वेतन हवे. मात्र, आम्हाला मिळतेय केवळ आश्वासन. अशावेळी 'आम्ही स्वतः मरू किंवा मारू' अशी पाळी आमच्यावर आणण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details