चंद्रपूर :लॉकडाऊनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सलून, स्पा, केशकर्तनालय बंद होते. याचा मोठा फटका या नाभिक वर्गाला बसला. मात्र, आज (रविवार)पासून ही सर्व आस्थापने सुरू करण्यात आली आहेत. काही अटी व शर्तीच्या अधीन राहून या सर्व आस्थापनांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
राज्याचे मदत पुनर्वसन, व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने यासंबंधीचा निर्णय कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यात आज या संदर्भात आदेश निर्गमित केला आहे.
हे आहेत निर्देश -
- सलून, स्पा, बार्बर शॉप, ब्युटी पार्लर, केशकर्तनालय इत्यादी दुकाने, आस्थापने सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत ते सुरू राहतील.
- यात काम करणारे कर्मचारी यांनी हँड ग्लव्हज, एप्रन व मास्क इत्यादी संरक्षणात्मक साहित्याचे वापर करणे बंधनकारक राहील.
- दुकानात हॅन्ड सॅनिटायजरचा वापर करून एका वेळेस कमाल एकच्या मर्यादेत सामाजिक अंतर राखून ग्राहकांना प्रवेश द्यावा.
- प्रत्येक ग्राहकानंतर खुर्चीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. तसेच दुकानातील फरशी, कॉमन क्षेत्र यांचेही दर दोन तासांनी नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील.
- ग्राहकांकरता डिस्पोजेबल टॉवेल, नॅपकिन वापरणे बंधनकारक राहील. त्याप्रमाणे डिस्पोजेबल उपकरणे प्रत्येक सेवेनंतर स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील.
- खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती फलक दुकानाच्या दर्शनी भागावर लावावी. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांची नोंद (नाव, संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक) नोंदवहीत घेण्यात यावी.
तर ही होईल कारवाई -
सदर आदेशांचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांना साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, 269, 270, 271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. तसेच, नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये 27 जून ते 30 जून या कालावधीकरता लागू राहील. तर, प्रतिबंधित क्षेत्राकरता (कंटेन्मेंट झोन) लागू राहणार नाही.