चंद्रपूर -देशातील लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरासाठी चंद्रपूरच्या ( Central Vista Project ) सागवान लाकडाची चौकट असणार आहे. भारतीय संसदेच्या नव्या इमारतीसाठी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील ( Sagwan Wood For New Parliament Building ) सागवान लाकडाचा पुरवठा होतो आहे. राज्याच्या वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर विभागाने यासाठी ऑगस्ट 2021 पासून 13 हजार घनफूट सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे लाकूड नवी दिल्लीला रवाना केले आहे.
बल्लारपूर येथे अव्वल दर्जाचे सागवान -सेंट्रल विस्टा प्रकल्प पूर्ण क्षमतेने पूर्णत्वास येत असताना याची उभारणी करणाऱ्या टाटा कंपनीने 'नारसी अँड असोसिएट' या कंपनीला अंतर्गत सजावटीचे काम दिले आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' मंत्राचा जागर लक्षात घेत या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पासाठी देश-विदेशातील सर्व सागवान लाकडाची आधी चाचणी घेतली. त्यात मजबुती-चकाकी आणि लाकडी वस्तूचे अभिजात सौंदर्य टिकून राहत असल्याचे सर्व निकष पूर्ण केल्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील वनविकास महामंडळाच्या सागवान लाकडाला अंतिम पसंती मिळाली. हे सागवान गडचिरोलीच्या आलापल्ली क्षेत्रातील असून, देशातील अव्वल दर्जाचे सागवान इथे बघायला मिळते.