चंद्रपूर-चिमूर तालुक्यातील राखीव वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात सागवान झाडांची तस्करी होत आहे. याला आळा घालण्यासाठी वनविभागाच्या विशेष पथकाची रात्री गस्त वाढवण्यात आली आहे. सोमवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान भीसी ते जांभूळविहिरा रोडवर अवैधरित्या साग झाडांची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळून आले. कारवाईत 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळील सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. या जंगलांत सागवान झांडांचे प्रमाण जास्त आहे. बांधकाम व गृहोपयोगी वस्तुंकरीता सागाच्या लाकडाची मागणी मोठी आहे. त्यामूळे वनविभागाच्या राखीव क्षेत्रातुन सागवान झांडाची कत्तल करून रात्री त्यांची वाहतुक करण्यात येते. यावर अंकुश ठेवण्याकरीता वनविकास विभागाचे विशेष पथक रात्रीच्या वेळी गस्त देते. या पथकाद्वारे भिसी-जांभुळविहीरा रोडवर गस्त सुरू असताना रात्री १० वाजताच्या सुमारास संशयास्पद ट्रॅक्टर आढळून आला. ट्रॉलीची तपासणी केली असता अवैध सागाची वाहतुक करीत असल्याचे आढळून आले.