चिमूर (चंद्रपूर) -भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी आला आहे. आज रविवारी सायंकाळी 4 वाजता तो सफारीसाठी घाईने निघाला. यावेळी त्याने पत्रकारांशी बोलणे टाळले. सचिन सोबत त्यांची पत्नी अंजली, बहिण, माजी क्रिकेटर प्रशांत वैद्य तसेच काही मित्र होते. ते सिरकाळा बफर झोनमध्ये सफारी करिता गेले.
पावसाळ्याचे दिवस असल्याने कोअर क्षेत्रात जंगल सफारी बंद आहे. त्यामुळे ताडोबाच्या मदनापुर बफर क्षेत्रात सचिनने शनिवारी सायंकाळी जंगल सफारी केली. पण या सफारीत त्याला वाघाचे दर्शन झाले नाही. यावेळेस त्याच्या सोबत वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी लिमये आणि गुरुप्रसाद हे सुद्धा होते. सायंकाळच्या जंगल सफारीमध्ये वाघ दिसला नाही. त्यामुळे रविवारी सकाळी ताडोबाच्या अलिझंझा बफर क्षेत्रात त्याने जंगल सफारी केली. या सफारीदरम्यान देखील वाघाचे दर्शन झाले नाही.
आज रविवारी सायंकाळी सिरकाळा बफर क्षेत्रात वाघ असल्याची माहिती मिळाली. यामुळे सचिन सर्वांसह सिरकाळा बफर झोनमध्ये सफारीसाठी गेला आहे.