चंद्रपूर - राजुरा वनपरिक्षेत्रात आठ जणांचा जीव घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या आरटी-1 वाघाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश मिळाले आहे. मागील आठ महिन्यांपासून या वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, वारंवार हा वाघ वनविभागाला हुलकावणी देत होता. एकदा पिंजऱ्यात अडकून देखील या वाघाने त्यातून सुटका करून पळ काढला होता. अखेर आज (मंगळवार) हा वाघ रेल्वे बोगद्यात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अडकला. यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
राजुरा वनपरिक्षेत्रात आरटी-1 वाघाने धुमाकूळ घातला होता. आतापर्यंत त्याने आठ जणांचा जीव घेतला. त्यामुळे या परिसरात या वाघाविषयी कमालीचा रोष होता. तसेच वाघाला गोळ्या घालून ठार करण्याची मागणी जोर धरत होती. यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. त्यामुळे या वाघाला बंदिस्त करण्यासाठी वनविभागावर दबाव वाढत होता. यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. वाघाला डार्ट मारून बेशुद्ध करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आले होते. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आणि ट्रॅप कॅमेरेदेखील लावण्यात आले होते.
वाघाच्या नेहमीच्या वाटेवर दोन पिंजरेही लावण्यात आले होते. त्यातील एक पिंजऱ्यात वाघाला आकर्षित करण्यासाठी तिथे शिकार ठेवण्यात आली होती. गुरुवारी रात्री वाघ येथे आला होता. जनावरावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात तो पिंजऱ्यात अडकलाही होता. मात्र, एवढ्या वजनी दाराला वाकवून हा वाघ पळून गेला आणि वनविभागाची चिंता आणखीन वाढली होती. या वाघाचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेरे आणि स्निफर डॉग म्हणजे विशेष कुत्र्यांची मदतही घेण्यात आली होती. या जंगलातील कंपार्टमेंट क्रमांक 179 येथे एका रेल्वे बोगद्यामध्ये पिंजरा लावण्यात आला होता. त्याच्या दोन्ही बाजूला दारे होती. त्यावर वजन पडले तर दोन्ही दारे आपोआप लागायची. याच पिंजऱ्यात हा वाघ फसला.
यानंतर लगेच त्याला बेशुद्ध करण्यासाठी टीम बोलाविण्यात आली आणि त्याला जेरबंद करण्यात आले. यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
वाघ किंवा इतर हिंस्र प्राण्यांच्या बचाव कार्यासाठी अनेकदा इतर वन्यजीव संघटनांची मदत घेतली जाते. अनेकदा त्यांना तांत्रिक माहिती आणि त्याचा अभ्यास नसल्याने आणि अति उत्साहीपणाने त्यात बचाव कार्य करणारे कर्मचारी किंवा त्या प्राण्यांच्या जीवावर येते. माजरी येथे एका धष्टपुष्ट वाघाचा जीव याच अतिरेकीपणामुळे गेला, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. चुकीच्या वेळी पिंजरा सोडण्यात आला आणि त्यात वाघ जबर जखम झाला होता. राजुरा येथे देखील अशीच अटीतटीची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, यावेळी ही जबाबदारी वनविभागाने स्वतःच्या खांद्यावर घेतली. यासाठी कुठल्याही वन्यजीव संघटनांची मदत घेण्यात आली नाही. या कारवाईत वनविभागाची चांगलीच दमछाक झाली. मात्र, वनविभागाने या वाघाला सुखरूप जेरबंद केले.