चंद्रपूर - जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका डोंगर दऱ्यांनी वेढला गेला आहे. याच्या एका बाजूने उंच डोंगर तर दूसऱ्या बाजूने खोल गेलेली दरी असे काहीसे दृष्य येथे पाहायला मिळते. सध्या निसर्गाने जिवती तालुक्यावर मुक्त उधळण केली असून डोंगर दऱ्यांनी हिरवा शालू पांघरलेले निसर्गाचे देखणे रूप डोळ्यात भरणारे आहे. मात्र, हे दृष्य बघायला जितके सुंदर तितकेच ते धोकादायकही ठरत आहे. या मार्गातील दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या वृक्षांच्या फांद्या प्रवाशांना ये जा करताना अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जिवती तालुका गाठण्यासाठी माणिकगड आणि भेंडावी ही २ प्रमुख मार्ग आहेत. या मार्गाच्या एका बाजूने उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूने खोल दरी असून हा मार्ग अतिशय अरुंद आहे. जिवती आणि पाटण ही गावे गाठण्यासाठी याच मार्गाने जावे लागत असून या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम अद्यापही झालेले नाही. त्यामुळे रुंदीकरणाअभावी स्थानिक नागरिकांना या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.