पॉझिटिव्ह रुग्णावर इलाज करणाऱ्या डॉक्टरांचे स्वॅब तपासणीला, संपर्कातील 84 व्यक्तींची नोंद - corona update
चंद्रपूर जिल्ह्यात आढळलेल्या एकमेव पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून, नागपूर येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आत्तापर्यंत 84 व्यक्तींची नोंद घेण्यात आली आहे.
चंद्रपूर - जिल्ह्यात आढळलेल्या एकमेव पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून, नागपूर येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आत्तापर्यंत 84 व्यक्तींची नोंद घेण्यात आली आहे. शिवाय या रुग्णावर उपचार केलेल्या 8 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे स्वॅब देखील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
2 मे रोजी चंद्रपूर शहरातील कृष्णनगर येथे एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या परिसरात सर्व नागरिकांची तपासणी सुरू आहे. या परिसरातील 25 नागरिकांना संस्थात्मक कॉरंटाइन करण्यात आले आहे. तर 59 नागरिकांना होम कॉरंटाइन करण्यात आले आहे. या परिसरात तापाचे 5 रुग्ण आतापर्यंत आढळून आले असून, पुढील तपासणी सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिली.
रुग्णाच्या संपर्कातील 57 नमुन्यापैकी 38 निगेटिव्ह आले आहेत. 19 अहवाल प्रतिक्षेत आहे. नागपूर येथे कोरोनाशिवाय अन्य आजाराच्या उपचारासाठी चंद्रपूरच्या ज्या पॉझिटिव्ह रुग्णाला पाठवण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णाच्या पत्नी, मुलगा व मुलगी यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, रुग्ण काम करीत असलेल्या अपार्टमेंटमधील सर्व रहिवाशांचा देखील अहवाल निगेटिव्ह आला आहे. तथापी, हा रुग्ण राहत असलेल्या परिसराची कडक नाकेबंदी करण्यात आली असून, प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. सदर रुग्णाची दुसऱ्यांदा स्वॅब तपासणी 14 आणि 15 मे रोजी होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील एकूण परिस्थिती पुढील प्रमाणे आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये 185 स्वॅब नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी 155 निगेटिव्ह आहेत. 29 अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत.