चंद्रपूर Ravindra Tonge Condition Critical :मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळत आहे. मात्र, या आंदोलनासाठी सरकारकडून कोणतेही आश्वासन न मिळाल्यानं आता ओबीसी समाज आणखी तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघासह इतर ओबीसी संघटना उद्या रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली : मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊ नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केलं होतं.आज उपोषणाच्या बाराव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावलीय. सकाळी त्यांच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब, साखरेची पातळी कमी झाल्यानं त्यांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र आंदोलनात खंड पडू नये म्हणून त्यांच्याऐवजी आता विजय बल्की, प्रेमानंद जोगी बेमुदत उपोषणावर बसले आहे.
नागपूर मार्गावर रास्ता रोको :या आंदोलनाची सरकारनं अद्याप दखल घेतली नसल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी मातोश्री विद्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन राजूरकर यांनी यावेळी पुढील आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली. उद्या, शनिवारी जनता महाविद्यालयासमोर नागपूर मार्गावर रास्ता रोको करण्यात येणार आहे.