चंद्रपूर - कोविड-19 साठी आरटीपीसीआर ही एकमेव निदान चाचणी आहे. यामध्ये बराच वेळ लागत आहे. कार्टीजची अनुपलब्धता आणि जास्तीचा खर्च ही या चाचणीची उणे बाजू आहे. आता वेळ आणि खर्चाच्या बचतीचा 'रॅपिड अँटिजेन टेस्ट किट'चा पर्याय पुढे आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील या रॅपिड अँटिजेन टेस्ट किट आल्या आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात अवघ्या 15 ते 20 मिनिटांत कोरोनाचे निदान करणे शक्य होणार आहे.
कोविड-19 साठी आरटीपीसीआर ही एकमेव निदान चाचणी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चाचणी केंद्र असून याची क्षमता ही दीडशे ते दोनशे चाचणी करण्याची आहे. मात्र, सध्या नमुन्यांचे प्रमाण वाढले असून अडीचशे ते तीनशे चाचण्या होत आहेत. त्यामुळे निदान होण्यास वेळ लागत आहे. त्यातही ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही आणि चिमूर येथील नमुने नागपूर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत होते. मात्र, आता रॅपिड अँटिजेन टेस्ट किट जिल्ह्यात दाखल झाल्याने चाचणीचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. त्यामुळे अवघ्या 15 ते 20 मिनिटांत कोरोना चाचणी होणार आहे.
चंद्रपूर येथे रॅपिड अँटिजेन टेस्ट किट दाखल.. जिल्ह्यातही होणार 15 मिनिटात कोरोना चाचणी हेही वाचा -पुण्यातील 'त्या' कोरोनामुक्त चालकावर बहिष्कार, विदेशातून आलेल्या कुटुंबामुळे झाला होता बाधित
चंद्रपूर जिल्ह्यातील 14 तालुक्यात प्रत्येकी एक आणि चंद्रपूर तालुक्यात अशी तीन म्हणजे एकूण 17 केंद्रात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठीचे प्रशिक्षण आरोग्य यंत्रणेला देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉट, शासकीय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयामध्ये तातडीच्या उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी रॅपिड अँटिजेन टेस्टचा उपयोग करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधिन होती. या अनुषंगाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 40 हजार किट खरेदीला मान्यता दिली. त्यात पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्याला एक हजार टेस्ट किट उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक केंद्रात साधारण शंभर चाचण्या करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
रॅपिड अँटिजेन टेस्ट किटची खासियत...
या चाचणीला आयसीएमआरसह ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सने तपासणीअंती मान्यता प्रदान केली आहे. ही चाचणी रुग्ण असलेल्या जागेवर निदानासाठी स्त्राव घेतल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली एक तासाच्या आत करावी लागते. या चाचणीचे निदान केवळ 15 वा जास्तीत जास्त 30 मिनिटात होते. ही चाचणी कोणत्याही बाह्य उपकरणाशिवाय करता येते. या चाचणीसाठी केवळ 450 रुपये खर्च येतो. शिवाय वेळही वाचतो. एक किट एकदाच उपयोगात येते.