चंद्रपूर - चंद्रपुरात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसाच्या पाण्याला फेस येत असल्याचे वेगळेच चित्र यावेळी पहायला मिळाले. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर कोळसा खाण परिसरात हा प्रकार दिसून आला. मात्र याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. झाडांवर-गवतावर-रस्त्यावर अनेक ठिकाणी हा पुंजक्याच्या स्वरूपातील फेस नजरेस पडला आहे. काही भागात तर या फेसाचे पुंजके बघायला मिळाला. त्यामुळे परिसरात हा पाऊस कुतुहलाचा विषय झाला आहे.
रासयानिक प्रक्रियेमुळे फेसनिर्मितीची शक्यता पर्यावरण विभागाने फेटाळली-
चंद्रपुरात मंगळवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसानंतर हाऔष्णिक वीज केंद्राच्या सुमारे दीड ते दोन किलोमीटर परिसरात फेस साठल्याचे दृश्य दिसून आले. ज्या भागात फेस पडला, त्या भागात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि अनेक कोळसा खाणी असल्याने या खाणीतून निघणाऱ्या वायू प्रदूषणामुळे पावसाच्या पाण्यावर रासयनिक प्रक्रिया होऊन अशा प्रकारे फेस निर्माण झाला असावा असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. या संदर्भात पर्यावरण अभ्यासकांनी चंद्रपूरचे प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात जाऊन विचारणा केली. त्यावेळी प्रदुषण कार्यालयाने दिलेल्या माहितीही धक्कादायक खुलासा झाला आहे की हा फेस निर्मितीचा प्रकार रासायनिक पृथ:क्करणातून झाला नाही. त्यामुळे या फेसयुक्त पावसाबद्दल अधिकच कुतूहल निर्माण झाले आहे.