चंद्रपूर Punganur Cattle : चंद्रपूरात सध्या जिल्हा कृषी महोत्सव सुरू आहे. यात विविध प्रकारचे पशुधन प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, यामध्ये 'पंगनूर' गायीची प्रजाती आकर्षणाचं केंद्र ठरतेय.
गायीचे वैशिष्ट्य :'दुधाळ गाय' म्हणून प्रसिद्ध असलेली ही गाय अवघी साडेतीन ते चार फूटांची असते. मात्र तिच्यात वर्षभरात 3000 लिटर दूध देण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे, जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात जो प्रसाद दिला जातो, तो याच गायीच्या शुद्ध तुपापासून तयार केला जातो. त्यामुळे या गायीला आध्यात्मिक महत्त्वही प्राप्त झालं आहे. असं असलं तरी या गायींची संख्या आता कमी होत असून, ती वाढवण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत.
गायींची संख्या कमी झाली : गायीच्या प्रजातींची तेथील भौगोलिक वातावरणानुसार जडणघडण होत असते. 'पंगनूर' प्रजातीची गाय आंध्र प्रदेशात आढळते. विशेषतः तिरुपती क्षेत्रातील पहाडी भागात ही प्रजाती दिसून येते. या गायीचा वापर शेतीच्या कामांसाठी तसेच दूध उत्पादनासाठी देखील केला जातो. मात्र गायीच्या या प्रजातीचं संवर्धन अपेक्षितरित्या न झाल्यानं तिची संख्या आता दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे ही प्रजाती धोक्यात आली असून केंद्र सरकारनंही याची दखल घेतली आहे. 'पंगनूर' गायींची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
म्हणून किंमत वाढली : चंद्रपूरच्या जिल्हा कृषी महोत्सवात ठेवण्यात आलेल्या या गायीची किंमत साडेतीन लाख रुपयांच्या आसपास आहे. कृषी महोत्सवात ठेवण्यात आलेली ही सर्वात महागडी गाय आहे. या गायींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यानं, त्यांची किंमत वाढली असल्याचं जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
हे वाचलंत का :
- काय सांगता! आधुनिक जगात बळीराजाचा 'बैल'ही झाला 'इलेक्ट्रिक'; ठरतोय आकर्षणाच केंद्र
- आगळावेगळा निरोप समारंभ; दहा वर्षे सेवा देणाऱ्या ग्रेसी, सिंबा श्वानांना निरोप