चंद्रपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अन्यायग्रस्त कामगारांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामुळे चंद्रपुरकरांचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
चंद्रपुरात 'पाणीबाणी'; पाणीपुरवठा करणाऱ्या अन्यायग्रस्त कामगारांचा एल्गार - CHANDRPUR
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अन्यायग्रस्त कामगारांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामुळे चंद्रपुरकरांचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

शहराला इराई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. याची जबाबदारी योगेश समरीत यांची कंपनी उज्वल कन्स्ट्रक्शनला देण्यात आली आहे. या कंपनीबाबत जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. पाणीपुरवठा करण्याबाबत ही कंपनी गंभीर नाही, असा आरोप केला जात आहे.
या कंपनीत कार्यरत कामगारांना देखील त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यात येते. त्यांना नियमित वेतन दिले जात नाही. त्यांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ दिला जात नाही. अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जात नाही, अशीही तक्रार हे कामगार वारंवार करीत असतात. मात्र, यावर जबाबदार प्रशासनाने अद्याप कुठली कारवाईची भूमिका घेतली नाही. ही मागणी घेऊन आता येथील कामगार संपावर गेले आहेत. जोपर्यंत त्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा या कामगारांनी घेतला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा ठप्प होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.