चंद्रपूर Protest Against Padalkar :उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी एक आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांच्या विधानाचा अजित पवार गटाकडून राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. चंद्रपुरातही पडळकरांविरोधात अजित पवार गटाच्या समर्थकांनी आक्रमक होत तीव्र आंदोलन केलं. यावेळी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. (Gopichand Padalkar vs Ajit Pawar)
पडळकरांचे वक्तव्य चुकीचे :आरक्षणासंदर्भात भाजपानेते गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन दिलं होतं. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन न दिल्याने त्यांना याबाबत विचारले असता अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून मानतच नाही म्हणत पडळकरांनी पुढे काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर तीव्र आक्षेप घेत पडळकरांना प्रत्युत्तर दिलं होतं. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांवर त्वरित कारवाई करावी असा इशाराही त्यांनी दिला होता. पडळकरांच्या विधानामुळे त्यांच्यावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली. अजित पवार गटातूनही याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असल्याने भाजपाच्या नेत्यांनी देखील पडळकरांची कानउघाडणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही पडळकरांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगून अशा पद्धतीचं वक्तव्य टाळण्याचा सल्ला त्यांना दिला. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही वैयक्तिक टीका कुणावरही करू नये असा सल्ला पडळकरांना दिला होता. मात्र, राष्ट्रवादीचा अजित पवार गट यावर आक्रमक झाला असून सुनील तटकरेंनी पडळकरांवर कारवाई करण्यासंदर्भात मागणी करणार असल्याचं सांगितलं. पडळकरांच्या त्या वक्तव्याचा अजित पवार गटाकडून संपूर्ण राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.