चंद्रपूर :चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात जमिनी जाणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याऐवजी बोगस कागदपत्रे सादर करून इतरांनाच नोकऱ्या देण्यात ( bogus jobs scam chandrapur ) आल्या. सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांनी हा घोटाळा समोर आणला. मात्र त्यांच्यावर एका अधिकाऱ्याने तब्बल 25 कोटी मानहानीचा दावा ठोकला होता. मात्र, प्रशासनाच्या कागदपत्रांच्या पडताळणीच्या चौकशीत 188 पैकी तब्बल 100 जणांचे कागदपत्रे बोगस असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता बळीराज धोटे हेच संबंधित अधिकाऱ्याला कोर्टात खेचण्याचा तयारीत आहे.
बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय आणि वीज केंद्रातील मानव संसाधन विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या संगनमतायाशिवाय इतका मोठा घोटाळा होणे शक्य नाही. समोर आलेला घोटाळा मोठा असून याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. मानव संसाधन उप महाव्यवस्थापक अरविंद वानखेडे आणि तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या चौकशीत मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते की, लहान कर्मचाऱ्यांना गळाला लावून हा तपास थांबतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
वीज केंद्रातील मानव संसाधन विभाग, जिल्हा पुनर्वसन कार्यालय आणि दलालांच्या रॅकेटने बेरोजगारांकडून कोट्यवधी रुपये उकळले. प्रकल्पग्रस्त असल्याची बोगस कागदपत्रे तयार केली आणि वीज केंद्रात प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांना नोकरी लावून दिली. मार्च 2021 मध्ये भरती झालेल्या 60 पैकी 25, तर नोव्हेंबर 2021 मध्ये निवड झालेल्या 128 उमेदवारांच्या यादीतील तब्बल 75 प्रकल्पग्रस्तांची कागदपत्रे बोगस असल्याचे आता समोर आले आहे. हा घोटाळा सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांनी उघडकीस आणला. याप्रकरणात आधीच काही जणांना अटक झाली आहे.
3 नोव्हेंबर 2021 लाचंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील मानव संसाधन विभागाचे उप महाव्यवस्थापक अरविंद वानखेडे यांनी 128 प्रकल्पग्रस्त उमेदवारांची निवड यादी जाहीर केली. या वीज केंद्रात सुरुवातीला प्रशिक्षणार्थी म्हणून 15 हजार रुपये मानधनावर सामावून घेतले जाते. यादीतील अनेक प्रकल्पग्रस्त बोगस असल्याची शंका काहींना आली. ज्यांच्याकडे शेतजमीन नव्हती ते सुद्धा प्रकल्पग्रस्त म्हणून दाखविण्यात आले होते. या निवड यादीवर धोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्षेप घेतला. निवड प्रक्रियेत गैरव्यवहार झाला आहे. यात कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे, अशी तक्रार तत्कालीन ऊर्जामंत्री, महाजकोनचे व्यवस्थापकीय संचालक, वीज केंद्राचे मुख्य अभियंती पंकज सपाटे यांच्याकडे केली.