चिमूर (चंद्रपूर) :कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून नगरपरिषद प्रशासनाला काही उपोययोजना करण्याबात दिशानिर्देश दिले. त्याप्रमाणे चिमूर नगरपरिषद प्रशासनाने शहरातील सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना हात धुण्यासाठी पाण्याचे ड्रम ठेवले आहेत. मात्र, मागील महिन्याभरापासून या ड्रममध्ये पाणी भरलेले नाही. त्यामुळे पाण्याशिवाय फक्त ड्रम उपलब्ध करुन हॅन्ड वॉशची सोय देत असलेल्या चिमूर नगरपरिषदेच्या 'हात की सफाई'वर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
देशात लॉकडाऊन घोषीत करताच प्रशासनाने सामान्य नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अनेक नियम घालुन दिले. त्याप्रमाणे चिमूर नगरपरिषदेकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होऊ नये, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, गर्दी करू नये, यादृष्टीने अंमलबजावणी आणि देखरेख सुरू आहे. नगरपरिषदेकडून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना हात धुण्यासाठी पाण्याचे ड्रम, साबण असलेले हॅन्ड वॉश केंद्र शहरात पाच ठिकाणी उभारण्यात आले आहेत. मात्र, ही व्यवस्था अल्प काळासाठीच कार्यान्वीत ठेवल्याचे दिसत आहे. सध्या या ड्रममध्ये पाणी नसून नगरपरिषदेचा फक्त स्टिकर लावलेले दिसत आहे.