महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोंबडीचोर निघाला कोरोना पॉझिटिव्ह; अन् पोलीस ठाणे झाले क्वारन्टाईन - chicken funny stealth Chandrapur

एक महिन्यापासून फिर्यादी या कोंबडीचोरांच्या शोधात होता. अखेर या कोंबडी चोरांची कुणकुण फिर्यादीच्या कानावर गेली. गावातील चार लोकांनी आपल्या कोंबड्या पळवल्याची माहिती त्याला मिळाली. त्याने बुधवारी या चौघांची तक्रार वरोरा पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी या चारही जणांना गावात जाऊन ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी केली असता एक जण पॉझिटिव्ह आढळला ...आणि पोलिसांची झोप उडाली.

कोंबडीचोर निघाला कोरोना पॉझिटिव्ह
कोंबडीचोर निघाला कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : Sep 5, 2020, 7:48 PM IST

चंद्रपूर - कोंबड्या चोरीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. न्यायालयात सादर करण्यापूर्वी संशयित आरोपींची कोरोनाची चाचणी करावी लागते. यात एक संशयित पॉझिटिव्ह निघाला आणि पोलिसांची झोपच उडाली. त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना त्वरित घरी पाठविले गेले असून अलगीकरणात ठेवले आहे. तर, संपूर्ण पोलीस ठाणेच क्वारन्टाईन झाले आहे. चोराला पकडून आता स्वतः कैदी असल्यासारखे राहण्याची पाळी येथील पोलिसांवर आली आहे. ही घटना वरोरा येथील आहे.

साधारण एक महिन्यांपूर्वी वरोरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नागरी या गावातील एका व्यक्तीच्या घरून 20 कोंबड्या चोरीला गेल्या. मात्र, याची तक्रार तरी करावी कशी आणि कोणाविरोधात हा पेच फिर्यादी समोर होता. मात्र, गावात अशी गुपित फार काही काळ टिकत नाही. जवळपास एक महिन्यापासून फिर्यादी या कोंबडीचोरांच्या शोधात होता. अखेर या कोंबडी चोरांची कुणकुण फिर्यादीच्या कानावर गेली. गावातील चार लोकांनी आपल्या कोंबड्या पळवल्याची माहिती त्याला मिळाली. त्याने बुधवारी या चौघांनी आपल्या कोंबड्या चोरल्याची तक्रार वरोरा पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी या चारही जणांना गावात जाऊन ताब्यात घेतले. यावेळी वाहन चालक आणि तीन पोलीस कर्मचारी गावात गेले होते. या आरोपींना ठाण्यात आणून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. आरोपींना न्यायालयात सादर करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करावी लागते. त्यानुसार शुक्रवारी त्यांची चाचणी करण्यात आली... आणि पोलिसांना जबर धक्का बसला. कारण त्यातील एक जण कोरोना पॉझिटिव्ह निघाला. ह्या आरोपीची रवानगी कोठडीत करण्याऐवजी त्याला कोविड केंद्रात दाखल करण्याची वेळ पोलिसांवर या घटनेमुळे आली.

इतर आरोपी कोरोना निगेटिव्ह आले असले तरी, कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या पोलिसांची झोप उडाली. आरोग्य विभागाला पाचारण करून संपूर्ण पोलीस ठाणे सॅनिटाइझ करण्यात आले. जे संपर्कात आले, त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने विलगीकरणात ठेवले असून पुढील तीन दिवस त्यांना पोलीस ठाण्यात येण्यास बंदी घातली आहे. त्यांची तीन दिवसांनी चाचणी करण्यात येणार आहे. आता पोलीस ठाण्यात येणाऱ्या आगंतुकांना येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ज्यांची तक्रार असेल त्या एकाच व्यक्तीने पोलीस ठाण्यात येण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अनेक तक्रारदार आरडाओरडा करून मोठमोठ्या आवाजात आपले गाऱ्हाणे मांडत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा सर्वात मोठा धोका असतो. त्यामुळे शिक्षित व्यक्तीकडून आपली तक्रार लिहून आणावी, अशा सूचना देण्यात आल्या आहे. कोंबडीचोरी प्रकरणात पकडण्यात आलेल्या आरोपीमुळे अख्ख्या पोलीस ठाण्यावरच कोरोन्टीन होण्याची वेळ आली आहे. याबाबत वरोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ह्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details