चंद्रपूर- गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडी गावात काल पोलिसांकडून कोरोना विषाणू सुरक्षा संबंधी मॉकड्रिल करण्यात आली. यावेळी पोलिसांनी गावात एक कोरोना संशयित रुग्ण असल्याचे जाहीर केले. त्यानंतर लॉकडाऊन केल्याने ग्रामस्थांमध्ये चांगलीच खळबळ माजली होती. मात्र, नंतर पोलिसांनी मॉकड्रिल असल्याचे समजून सांगितल्यावर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मॉकड्रिल दरम्यान गावात कोरोनाबाधित व्यक्ती आल्यास सुरक्षा यंत्राणांच्या संभाव्य खबरदारी उपायोजनांच्या अमलबजावणीचे सराव करण्यात आले. या वेळी पोलिसांनी विठ्ठलवाडी गावात नागरिकांची ये-जा होऊ नये यासाठी गावाच्या सिमेवर गस्त घातली. तसेच परिसरातील इतर ८ गावांना देखील हाई अलर्ट जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर, मॉकड्रिलमध्ये समावेश असलेल्या डॉक्टरांनी खोट्या संशयित रुग्णाची तपासणी केली, त्यानंतर रुग्णावाहिकेद्वारे रुग्णाला उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले.