चिमूर (चंद्रपूर) -चिमूर तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वहानगाव येथे गावठी हातभट्टीची दारू विक्री होत आहे. ज्यामुळे परिसरातील दारू शौकीन वहानगाव येथे येऊन आपला शौक भागवित आहेत. लॉकडाऊन काळात संचारबंदी असतानाही गावात येणाऱ्या तळीरामांंना अद्दल घडविण्यासाठी उपसरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामसुरक्षा दलाच्या अध्यक्षांनी चार तळीरामांवर प्रत्येकी दोनशे रुपये दंड आकारले.
चिमूरमध्ये तळीरामांवर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई - CHANDRAPUR COVID 19
चिमूर तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वहानगाव येथेही हातभट्टीची दारू मिळत असल्याने परीसरातील तळीराम घसा ओला करण्यासाठी रोजची वारी करीत असल्याचे पदाधिकाऱ्यांना दिसून आले.
देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. या काळात विविध व्यवसाय प्रतिष्ठानांसोबतच देशी, विदेशी दारूची दुकाने, वाईनशॉप आणि बारसुद्धा बंद करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याने अवैध देशी, विदेशी दारू साठवून असेपर्यंत विकण्यात आली. मात्र, हा साठा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात हातभट्टीच्या दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री वाढलेली आहे. चिमूर तालुक्यामध्येही याचे प्रमाण सर्वत्र दिसून येते. तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वहानगाव येथेही हातभट्टीची दारू मिळत असल्याने परीसरातील तळीराम घसा ओला करण्यासाठी रोजची वारी करीत असल्याचे पदाधिकाऱ्यांना दिसून आले.
सर्वत्र कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून स्वतःसोबत गावकऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याकरीता युध्द पातळीवर उपाय योजना सुरू आहेत. मॉस्क आणि शारीरीक अंतर पाडत नसलेल्या दारूबाजामूळे कोरोना विषाणूंचे संक्रमण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वहानगाव येथे रोजच दारू पिण्याकरीता बाहेरगावातून येणाऱ्या तळीरामांना रोखण्याकरीता उपसरपंच प्रंशात कोल्हे, पोलीस पाटील एस. जी. नरुले आणि ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष विलास गोठे यांनी कंबर कसली. खानगाव, खापरी, येरखडा येथील चार तळीराम रात्री गावात येऊन पिऊन जात असताना त्यांना गाठून त्यांच्यावर मॉस्क न वापरल्यामुळे प्रत्येकी २०० रुपये दंड आकारले. तसेच त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने मॉस्कही देण्यात आले.