चंद्रपूर- चिमूर विधानसभा मतदारसंघात गाव तेथे बिअरबार, दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला सवलतीच्या दरात रेशन कार्डावर दारू, कायदेशीर मार्गाने दारू पिण्याचे अधिकार, इत्यादी आश्वासन मी आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. मात्र, नागरीकांना बेकायदेशीर मार्गाने दारू प्यायची असल्याने मला मतदारांनी नाकारल्याची प्रतिक्रिया मतदार संघातील एकमेव महिला उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात १ मे २०१५ ला दारूबंदी घोषित करण्यात आली. दारूबंदीने फक्त कायदेशीर दारू विक्रीला बंदी झाली. मात्र, अवैध दारू विक्रीला ऊत आले. यामुळे पोलीस प्रशासन आणि अबकारी विभाग घायकुतीला आले आहे. अवैध दारू विक्री प्रत्येक गल्ली बोळात सुरू करण्यात आल्याचे चित्र आहे. मात्र, यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत दारूबंदी विरोधातील आपल्या आगळ्या वेगळ्या जाहीरनाम्यामुळे चिमूर मतदारसंघातील महिला उमेदवार वनिता राऊत प्रचंड गाजल्या.
गाव तेथे बीअर, सवलतीच्या दरात दारू, अशा घोषणांमुळे त्या राज्य आणि देश पातळीवर प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या. मात्र, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. पराभवाबाबत बोलत असताना वनिता यांनी सांगितले की, मला मतदारांनी २८६ एवढे अल्प मते देऊन नाकारले आहे. मतदारांनी जाहीरनामा समजूनसुद्धा आणि त्यांचे आर्थिक शोषण होत असतानाही त्यांना आपले हित दिसले नाही. त्यामुळे आपण यापुढे चिमूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करणार नाही.