चंद्रपूर - हिराईनगर येथील नागरिकांनी पुन्हा एकदा मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात वीज, पाणी, रस्ते अशा कोणत्याही सुविधा नाहीत. यासाठी शासनाला विनंत्या करूनही कोणतीही उपाययोजना करण्यात शासनाने पुढाकार घेतला नसून,गावकरी संतप्त आहेत. पदरी निराशाच पडल्याने आपण कोणालाही मतदान करणार नाही, अशी ठाम भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.
हेही वाचा - ..त्यामुळे आमचे उमेदवार आम्हीच ठरवणार, चंद्रपुरात बेरोजगार युवकांचा एल्गार
हिराई नगर परिसरात पूर्वी एक उद्योग होता. परंतु, तो बंद पडला आहे. ही जागा शासनाकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. मात्र, उद्योगच बंद पडल्याने येथील कामगारांनी या जागेवर वसाहत निर्माण केली आहे. या विरोधात उद्योगाच्या मालकाने न्यायालयात धाव घेतली. तेव्हा पासून ही जागा वादग्रस्त आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांना शासनाने कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांची देखील येथे वानवा असून, शासकीय योजनांचा लाभ या नागरिकांना मिळत नाही.