महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 12, 2021, 6:40 PM IST

Updated : May 12, 2021, 6:55 PM IST

ETV Bharat / state

दुर्मीळ आजार असणाऱ्या म्युकरमायकोसिसचे आता रोज सापडत आहेत रुग्ण, जाणून घ्या आजाराची गंभीरता अन् लक्षणे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा भयंकर प्रसार होत आहे. यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांसमोर आता एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे. ते म्हणजे म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार. स्टिरॉइड्ससारख्या औषधांच्या भडिमारामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती फार कमी झाली आहे, किंवा ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा रुग्णांना हा आजार गाठत आहे.

patients-with-rare-mucor-mycosis
patients-with-rare-mucor-mycosis

चंद्रपूर -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा भयंकर प्रसार होत आहे. यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांसमोर आता एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे. ते म्हणजे म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार. स्टिरॉइड्ससारख्या औषधांच्या भडिमारामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती फार कमी झाली आहे, किंवा ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा रुग्णांना हा आजार गाठत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी हा आजार दुर्मिळ समजला जात होता, मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बऱ्या होणाऱ्या काही रुग्णांमध्ये हा आजार दिसून येत आहे. यातील भयंकर बाब म्हणजे वेळेवर उपचार झाले नाहीत तर डोळे किंवा जबडा निकामी होऊन तो काढावा लागतो. जर हा संसर्ग मेंदुपर्यंत गेला तर रुग्ण दगावण्याची देखील भीती असते.

म्युकरमायकोसिस रुग्णांवर सध्या डॉ. उराडे दाम्पत्य उपचार करीत आहेत. डॉ. विजय उराडे हे जबडा तज्ञ आहेत तर त्यांच्या पत्नी डॉ. प्रीती उराडे या नेत्रतज्ञ आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास दहा रुग्णांवर उपचार केले आहेत. विशेष म्हणजे त्यामुळे त्यांचे अवयव निकामी होण्यापासून वाचले आहेत. मात्र काहींना बराच उशीर झाला अशावेळी त्यांचा जबडा काढण्याची वेळ आली. त्यामुळे या आजाराबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉ. उराडे दाम्पत्य देतात. ईटीव्ही भारतने या दाम्पत्याशी विशेष संवाद साधला.

दुर्मिळ आजार असणाऱ्या म्युकरमायकोसिसची गंभीरता अन् लक्षणे
काय आहे म्युकरमायकोसिस -

म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. त्याचे कण हवेत नैसर्गिकरित्या असतात. हे कण श्वसनाद्वारे नाकात शिरतात. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्यांना काहीही होत नाही. मात्र, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते त्यांना हा आजार ग्रासतो.

कुणाला असतो धोका -

ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना किडनीचा आजार आहे, ज्यांच्यावर कॅन्सर सारखे उपचार सुरू आहेत, किमोथेरपी सुरू आहे, जे एचआयव्हीचे रुग्ण आहेत, ज्यांना अत्याधिक प्रमाणात अँटिबायोटिक, अँटीव्हायरल औषध दिले जातात. ज्यांना अनेक दिवस स्टिरॉइड्सची औषधे दिली जातात, ज्यांना अनेक दिवस बायपँप मशीन, व्हेंटिलेटरवर राहावे लागते अशा लोकांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

कसा होतो संसर्ग -


सुरुवातीला श्वसनातून नाकावाटे हे बुरशीजन्य किटाणू आत जातात. नाकात ही बुरशी पसरत जाते. नाकाच्या दोन्ही बाजूला ती पसरते, यानंतर हा संसर्ग जबड्यात, त्यानंतर डोळ्यात आणि त्यानंतर मेंदूत जाऊ शकतो.

काय आहेत लक्षणे ?

नाकपुड्या बंद होणे, बधिरपणा येणे, पापण्याला सूज येणे, डोळ्याने दोन-दोन दिसणे, दात दुखायला लागणे अशी याची लक्षणे आहेत.

दररोज वाढत आहे रुग्णांची संख्या -

म्युकरमायकोसिस हा पूर्वी दुर्मीळ आजार समजला जात होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या रुग्णांत अचानक वाढ झाली आहे. आधी एक-दोन रुग्ण जबडा तज्ञ (maxilofacial surgeon) डॉ. विजग उराडे यांच्याकडे यायचे मात्र आता त्यांचा ओघ चांगलाच वाढला आहे. काही काही तर गंभीर स्वरूपाचे रुग्ण त्यांच्याकडे येत आहेत. ज्यांना आपला जबडा देखील काढावा लागला. विशेष म्हणजे या रुग्णांत वयाची काही मर्यादा नाही. 20 वर्षांपासून तर 80 वर्षांपर्यंत हे रुग्ण आढळून येत आहेत. असे डॉ. उराडे सांगतात.

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांना का होतोय संसर्ग -

कोरोना रुग्णाला उपचारादरम्यान स्टिरॉइड्स आणि अँटीव्हायरल औषध दिली जातात. काहीवेळा त्याची गरज असते तर काही वेळा काही डॉक्टर गरज नसताना देखील याचा सर्रास वापर करतात. ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत अशांवर देखील या औषधांचा भडीमार केला जातो. जेव्हा ते बरे होतात त्यावेळी त्यांच्या शुगरच्या प्रमाणात मोठी वाढ होते. काही तर यापूर्वी मधुमेहाने ग्रस्त नव्हते असे कोविड नंतर मधुमेहाने ग्रस्त असल्याचे देखील आढळले. अशा लोकांना काही दिवसात लक्षणे दिसून येत आहे. ही स्थिती चिंता वाढविणारी आहे. अशी लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क करण्याचे आवाहन डॉ. उराडे दाम्पत्याने केले आहे.

Last Updated : May 12, 2021, 6:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details