चंद्रपूर - ज्यांच्यावर जंगलाच्या सुरक्षेची जबाबदारी टाकण्यात आली अशाच वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही नियमांचे पालन न करता पार्टी केली आहे. दारूच्या नशेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मटनावर यथेच्छ ताव मारला. मात्र, या ओल्या पार्टीच्या चर्चेचा वास आता सर्वत्र दरवळत आहे.
चंद्रपूर: वाघाच्या परिसरात दारू, मटण आणि वनविभाग.... - forest department chandrapur
ज्यांच्यावर जंगलाच्या सुरक्षेची जबाबदारी टाकण्यात आली अशाच वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही नियमांचे पालन न करता पार्टी केली आहे. दारूच्या नशेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मटनावर यथेच्छ ताव मारला.
ज्या परिसरात वाघाची दहशत आहे. ज्यात एकाचा मृत्यू तर एक थोडक्यात बचावला आहे, त्याच जंगल परिसरात चक्क ओली पार्टी करण्यात आली. तेही ज्यांच्यावर या जंगलाची सुरक्षा करण्याची जबाबदारी देण्यात आली त्या वनविभागानेच. शनिवारी 20 ते 25 लोकांना एकत्र येत पार्टीचा जल्लोश केला. हा प्रकार घोडाझरी अभयारण्य येथे घडला. विशेष म्हणजे याच परिसरात काही दिवसांपूर्वी वाघाने एकाला ठार केले होते, तर दुसऱ्या घटनेत एक जखमी झाला होता. या सर्व स्थितीला धाब्यावर बसवत ही पार्टी झाली. त्यात दारू आणि मटण होते. याची कुणकुण काही वन्यजीवप्रेमी आणि स्थानिक पत्रकारांना लागली. ते घटनास्थळी पोहोचले असता त्यांनाही हा प्रकार दिसून आला. सोबत जुगरही खेळला जात होता.
मद्यधुंद असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना धमकी देत अरेरावी केली. "तुम्हाला जंगलात शिरण्याची परवानगी कोणी दिली? आमच्या पार्टीस्थळी तुम्ही कसे आले?" असे उलट प्रश्न करण्यात आले. विशेष म्हणजे या अभयारण्यात पार्टी करण्यास सक्त मनाई आहे. तसे आढळल्यास हजार रुपये दंड आहे. मात्र, या सर्व नियमांना तिलांजली देण्याचे काम नागभीड वनविभागाने केले आहे. या संतापजनक प्रकारावर वनविभागाचे वरीष्ठ आधीकारी नेमकी कुठली कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.