चंद्रपूर: मागच्या वर्षी शासनाने काढलेल्या परिपत्रकामूळे जिल्ह्यातील तलावातील मासेमारी प्रभावित झाली आहे. मत्स्य विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार आता ना हरकत प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 93 तलावांचे मासेमारीचे कंत्राट रखडले आहे, जिल्ह्यातील केवळ 9 तलावांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
एनओसीची जाचक अट:जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तलाव आहे. या तलावांत मत्स्य सोसायट्यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून मासेमारी सुरू आहे. मासेमारी करीत असलेल्या तलावांचे दर 5 वर्षांनी ठेका नुतनीकरण करावे लागते. मत्स्य विकास विभागाने २५ नोव्हेंबर २०२१ रोजी एक परिपत्रक काढले. त्यात ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय तलाव ठेका नुतनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील बहुतांश मत्स्य सहकारी सोसायट्या 30 ते 40 वर्षांपूर्वी नोंदणीकृत झाल्या. तेव्हा एनओसीसह अन्य काही कागदपत्रांची गरज नव्हती. मात्र, आता एनओसीची जाचक अट टाकण्यात आली. एनओसीच मिळत नसल्याने तलाव ठेका नुतनीकरणाची प्रक्रिया थंडबस्त्यात पडली असून मासेमारीही सध्या बंद आहे.
पाटबंधारे विभागाच्या तलावांवर मासेमारी: चंद्रपूर जिल्ह्यात एक हजार ९६४ तलाव आहे. या तलावांचे क्षेत्र १९ हजार ३८९ हेक्टर आहे. त्यापैकी एक हजार १६४ तलावांवर मत्स्य सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून मासेमारी चालते. या तलावांचे क्षेत्रफळ १७ हजार १३२ इतके आहे. मत्स्य विभाग पाटबंधारे विभागाच्या तलावांवर मासेमारी करते. पाटबंधारे विभागाचे एकूण ९३ तलाव आहेत. या तलावांवर मत्स्य सहकारी सोसायट्या मासेमारी करतात. मासेमारी करीत असलेल्या तलावांचे दर पाच वर्षांनी नुतनीकरण करावे लागते. नुतनीकरणाची प्रक्रिया आधी सरळ होती.