चंद्रपूर -आधी कोरोनाचे संकट आणि आता महागाईने जनता त्रस्त असताना राजकारणी लोकांनी धीर देणे अपेक्षित होते. परंतु, सत्ताधारी असो की विरोधक लोकांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. उलट त्यांच्याकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे भविष्यात दंगली होतील. यात सर्वसामान्य कुटुंबांची घरे जळतील. त्यांचीच मुले उद्ध्वस्त होती. हा जीवघेणा खेळ थांबवा. दगड आणि तलवारी देण्याऐवजी आमच्या मुलांच्या हाताला रोजगार द्या, अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील अठरापगड जातींच्या तब्बल 22 संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांच्यासह प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडे ( Our Boys Not Join Creating Religios Riots ) केली.
यासंदर्भात समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी शनिवारी ( 20 एप्रिल ) चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषद आपली भूमिका मांडली. अद्याप कोरोनाचे संकट गेले नाही. लाखो लोकांचे रोजगार बुडाले. कोट्यवधी छोट-मोठे उद्योग बंद पडले. आता कुठे पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महागाई, इंधनाचे दर गणनाला भिडले आहे. यावर राजकीय पक्ष बोलायला तयार नाहीत. प्रत्येकाला आपल्या धर्माची उपासना करण्याचा अधिकार संविधानानेच दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांनी बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य झिजवले. त्यामुळे आज आमचा बहुजन समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर, दुसरीकडे धार्मिक दंगली आणि तेढ निर्माण करण्यात आमच्याच समाजातील तरुण-मुलांचा वापर केला जातो. आजवरच्या अनेक दंगलीत हीच वस्तुस्थिती समोर आली आहे. आमच्या मुलांचा अशा पद्धतीने होणारा वापर चिंतेची बाब आहे. मात्र, यापुढे आम्ही बहुजन समाजातील मुलांचा दंगलीसाठी वापर होवू देणार नाही, असेही या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.
धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली आमचीच मुले तुरुंगात जातात, राजकीय हेतू साध्य झाल्यावर त्यांना सोडविण्यासाठी कोणी पुढे येत नाही. आईवडिलांनाच आपल्या मुलांसाठी कचेरी आणि न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. यात त्यांचे आयुष्य उध्वस्त होते. कुटुंबालाही मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे बहुजन समाजातील युवकांनी अशी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कुठल्याही आंदोलनात सहभागी होवू नये, असे आवाहन त्यांनी केली.