महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 18, 2023, 8:45 AM IST

Updated : Mar 18, 2023, 8:57 AM IST

ETV Bharat / state

Ordnance Manufacturing Day 2023 : जाणून घ्या, कारगिल युद्धात महत्वाची भूमिका बजावणारी चांदा आयुध निर्माणी

देशभरात आज आयुध निर्माणीदिन साजरा होत आहे. संरक्षण दलाला युद्धासारख्या संकटात दारूगोळा आणि इतर रसद पुरविणारी चांदा आयुध निर्माणी ही चंद्रपूरमध्ये आहे. या आयुधनिर्माणीमुळेच भारताने कारगील युद्धात पाकिस्तानच्या सैनिकांची दमछाक उडविली होती.

Ordnance Manufacturing Day
Ordnance Manufacturing Day

चंद्रपूर : पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसून 3 मे 1999 रोजी युद्ध छेडले. आधी मैत्रीचा हात पुढे करून अचानक झालेला हा हल्ला देशासाठी अनपेक्षित होता. मात्र भारतानेदेखील या घुसखोरीला चोख उत्तर देण्याचे ठरवले. अखेर 26 जुलै 1999 या दिवशी आपण या युद्धात विजय मिळवला. या विजयात बोफोर्स या तोफेचा सर्वात मोठा वाटा होता. बोफोर्स या तोफेचा. आणि यासाठी लागणारा सर्व दारुगोळा हा एकट्या चंद्रपूर येथील चांदा आयुध निर्माणी येथून पुरविण्यात आला होता. येथील कर्मचाऱ्यांना अक्षरशः दिवसरात्र राबून हा दारुगोळा निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

वरिष्ठ महाप्रबंधक अशोक लांबा यांची महत्वाची भूमिका:1999 मध्ये कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर सीमेवरील जवानांना दारुगोळा पुरवण्याचे मोठे आव्हान देशातील विविध निर्माणी समोर उभे ठाकले होते. अशा वेळेस अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि योग्य वेळेवर दारुगोळा पोहोचणे आवश्यक होते. बोफोर्स या तोफेसाठी लागणारा दारुगोळा हा भारतातून एकमेव चांदा आयुध निर्माणी येथून तयार करण्यात आला. तो सीमेपर्यंत पोहोचविण्यात आला. तत्कालीन वरिष्ठ महाप्रबंधक अशोक लांबा यांनी कर्मचाऱ्यांकडून नियोजनबद्ध काम करून घेणे हे अत्यंत आव्हानाचे काम पेलत कमी वेळेत उत्पादन घेतले. लांबा यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कुठलाही तुटवडा न पडू देता दारूगोळ्याचे उत्पादन अविरत सुरू ठेवले. यासाठी त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी देखील महत्त्वाची साथ दिली. तब्बल एकेका कर्मचाऱ्याने बारा तास काम करून देशाच्या सुरक्षेसाठी हातभार लावला.



काय आहे आयुध निर्माणीचा इतिहास:आयुध निर्माणीचा इतिहास हा जवळपास 222 वर्षांपूर्वीचा आहे. इंग्रज काळापासून या आयुध निर्माणीची स्थापना झाली. हा दिवस आयुध निर्माणी दिवस म्हणून साजरा केला जातो. 18 मार्च 1802 मध्ये काशीपूर कोलकत्ता येथे देशाच्या पहिल्या आयुध निर्माणीची स्थापना झाली. यानंतर देशात जवळपास 41 आयुध निर्माणी सध्या कार्यरत आहेत. त्यांचे आता खासगीकरण झाले आहे. या निर्माणीमध्ये तिन्ही सुरक्षा दलाला आवश्यक असलेले दारूगोळा, तोफ, बंदूका, उपकरणे आणि तंत्रज्ञान यंत्रणा विकसित केली जाते.


चांदा आयुध निर्माणीची स्थापना:चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे चांदा आयुध निर्माणीची घोषणा 1962 मध्ये करण्यात आली. तब्बल दोन हजार एकर मध्ये पसरलेल्या या विस्तीर्ण उद्योगांमध्ये 1970 पासून दारूगोळा व विविध शस्त्र तयार करण्याचा कारखाना आणि उत्पादन सुरू झाले. चांदा आयुध निर्माणी मध्ये तोफगोळे, ग्रेनेद, बंदुकाला लागणारा दारू दारूगोळा तसेच इतर सुरक्षा संबंधित उपकरणे तयार केली जातात. 1970 मध्ये 13 युनिटमध्ये आठ हजार कर्मचारी कार्यरत होते. त्याकाळी तंत्रज्ञान तेवढं विकसित न झाल्याने मनुष्यबळावर अवलंबून राहावे लागत होते. सध्या चांदा आयुध निर्माणीत 14 युनिट स्थापन असून अडीच हजार कर्मचाऱ्यांच्या भरवशावर येथे काम चालते. कारगील युद्धात चांदा आयुध निर्माणीचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले. आजही या आयुध निर्माणीतून देशाचे रक्षण करण्यासाठीचे साहित्य तयार करण्यात येते.

हेही वाचा-Students Protest : शिक्षक संपावर, विद्यार्थी रस्त्यावर; शिक्षक उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी चिमुकल्यांचा रास्ता रोको

Last Updated : Mar 18, 2023, 8:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details