चंद्रपूर- देशात सर्वत्र काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला. मोदींच्या त्सुनामीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा सुटले नाहीत. अनेक राज्यात काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्रात अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांना धूळ खावी लागली. अशा परिस्थितीत बाळू धानोरकर निवडून आले. असे करून त्यांनी काँग्रेसची लाज राखली. काँग्रेसकडून निवडून येणारे ते राज्यातील एकमेव खासदार ठरले. म्हणूनच त्यांचा हा विजय विश्लेषणाचा विषय ठरला आहे.
सेनेने भाजपशी युती केल्याने पूर्व विदर्भातील सेनेचे एकमेव आमदार बाळू धानोरकर हे नाराज होते. अनेकदा त्यांनी आपली अस्वस्थता जाहिरपणे बोलून दाखवली. तसेच आगामी काळात आपण खासदारकीसाठी लढणार असल्याचेही संकेत दिले. त्यामुळे काँगेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी ते इच्छुक होते. त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यास विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार हे आग्रही होते. यासाठी धानोरकरांना घेऊन त्यांनी दिल्ली गाठली. मात्र, काँग्रेसच्या एका गटाने याला तीव्र विरोध केला. त्यामुळे ही उमेदवारी ज्येष्ठ नेते विनायक बांगडे यांच्याकडे गेली. यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. हे प्रकरण शरद पवारांपर्यंत गेलं. त्यांच्या मध्यस्थीने अखेर बांगडे यांचे यादीतून नाव कापून धानोरकरांना संधी देण्यात आली.
सलग तीनवेळा निवडून आलेले आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेले भाजपचे हंसराज अहिर यांना काट्याची टक्कर धानोरकर देऊ शकतात. असे नेतृत्व सध्या मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षात एकही नाही. अशी भावना अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांची होती. त्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधीसुद्धा आले होते. यावेळी व्यासपीठावरून बोलताना आपण कुठल्याही परिस्थितीत धानोरकरांना निवडणूक आणू असा शब्द गांधी यांना दिला होता. तर अहिरांसाठी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनीसुद्धा प्रचार केला. यामध्ये रावसाहेब दानवे, राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी या दिग्गज नेत्यांचा समावेश होता.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांची देखील सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. असे असताना देखील याचा लाभ हंसराज अहिर यांना होऊ शकला नाही. मागील तीन वेळा निवडूण येऊनही ते काही ठोस असे करू शकले नाही. निष्क्रिय मंत्री अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. भाजपच्या अंतर्गत गोटातही हीच चर्चा होती. सोबत राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दोघांचे असलेले मतभेदही अनेकदा दिसून आले. वंचित बहुजन आघाडीने माळी समाजाचे राजेंद्र महाडोळे यांना उमेदवारी दिली होती. माळी समाजाची संख्खा येथे लक्षणीय आहे. सोबत माना, ढिवर, दलित समाजामध्ये वंचितने प्रभाव टाकला. प्रकाश आंबेडकर येथे दोनदा प्रचारासाठी येऊन गेले. वंचितचा सर्वाधिक फटका अहिरांना बसला. मूल सारख्या मुख्यमंत्र्यांच्या शहरात ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. सुधीर मुनगंटीवारांच्या बालेकिल्ल्यातही अहिर पिछाडीवर गेले. धानोरकर हे कुणबी समाजाचे आहेत. राजुरा येथे या समाजाची सर्वाधिक संख्या आहे. येथून त्यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले. त्यामुळे देशात सर्वत्र मोदींची त्सुनामी असताना अहिरांना याचा लाभ मिळाला नाही आणी ते पराभूत झाले. धानोरकरांच्या या विजयाची आता देशभरात चर्चा होत आहे.
विधानसभा निहाय मिळालेली मते
चंद्रपूर
हंसराज अहिर (भाजप) : 78,187
बाळू धानोरकर (काँग्रेस) : 1,03931
राजेंद्र महाडोळे (वंचित बहुजन आघाडी) : 21,048