चंद्रपूर- सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आठ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, एका दिवशी केवळ 20 शेतकऱ्यांनाच कापूस विक्रीची परवानगी दिली जात आहे. त्यामुळे कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची भलीमोठी रांग लागत आहे. कापूस खरेदीच्या या प्रक्रियेत वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
कापूस विक्रीसाठी आठ हजार शेतकरी रांगेत... हेही वाचा-क्वारंटाईनमधून कुटुंबीयांना फोन करू नका, तेही क्वारंटाईन होतील' वादग्रस्त ट्विटमुळे पत्रकाराला अटक
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लाॅकडाऊन सुरू आहे. त्यात राज्यात संचारबंदी सुरू असल्याने सीसीआय मार्फत होणारी कापूस खरेदी बंद केली आहे. लाॅकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून आहे. त्यात खासगी व्यापाराकडून कवडीमोल भावात कापूस खरेदी सुरू आहे. खासगी जिनिंग मालकाकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याने सीसीआय मार्फत कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
राजुरा येथील तुलना किसान जिनिंगवर सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली आहे. मात्र, दररोज केवळ 20 शेतकऱ्यांंकडील कापूस खरेदी केले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती राजूराकडे जवळपास आठ हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची भलीमोठी रांग लागली आहे. आपला नंबर कधी येईल? याची प्रतिक्षा करीत शेतकरी उभे आहेत. शेतीचा खरीप हंगाम दीड महिन्यावर येवून ठेपला आहे. शेतीचा मशागतीसाठी हातात पैसा नाही. कापूस विक्री लांबणीवर गेल्यास शेतकरी अडचणीत सापडणार आहे. दरम्यान, पुन्हा काही जिनींगवर सीसीआयने कापूस खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.