महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 28, 2020, 10:53 AM IST

ETV Bharat / state

चंद्रपूरमध्ये आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त, टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून निरोप

बिनबा गेट परिसरातील युवतीने कोरोनावर मात केली आहे. तिला टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील 22 पैकी 2 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून इतर वीस रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

corona patient recovered in chadrapur
चंद्रपूरमध्ये आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त

चंद्रपूर- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 22 आहे. त्यापैकी आता बिनबा गेट परिसरातील युवतीने कोरोनावर मात केली आहे. तिला टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून निरोप देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील 22पैकी 2 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून इतर वीस रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 20पैकी 6 रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर तर 14 रुग्णांना कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू असून त्यांना संस्थात्मक व गृह विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे

कंटेनमेंट झोनमधील सर्व कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य पथकांमार्फत दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दिल्ली येथून 1, मुंबई 3, ठाणे 2, पुणे 6, यवतमाळ 2 आणि नाशिक येथून आलेल्या 3 जणांचा समावेश आहे. तर, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही अशा रुग्णांची संख्या 5 आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातून आतापर्यंत 881 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत. यापैकी 22 नमुने पॉझिटिव्ह असून 776 निगेटिव्ह आहेतो. तर, 83 नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

कोरोनामुक्त युवतीने मानले आभार -

योग्य उपचाराने कोरोना मुक्त होता येते. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. कोरोना रुग्णांना कोविड रुग्णालयामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा व उपचार दिले जातात. मलाही सर्व सुविधा व उपचार मिळाल्याने मी कोरोनामुक्त झाले आहे. आपण सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून तसेच सुरक्षित अंतर ठेवून दैनंदिन काम करावे, असे आवाहन कोरोनामुक्त झालेल्या युवतीने नागरिकांना केले.

ABOUT THE AUTHOR

...view details