चिमूर (चंद्रपूर) - तालुक्यातील खडसंगी येथील कब्रस्तानच्या भिंतीला लागून चिमूर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे पाईप ठेवण्यात आले होते. त्या पाईपखाली दबून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 18 ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे कंत्राटदार कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांनी आक्रोश व्यक्त केला असून घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिमूर नगर परिषदेच्या वाढी 58 कोटी पाणी पुरवठा योजनेसाठी चारगाव तलावाचे पाणी चिमूर येथे येथे आणण्यासाठी पाईप लाईनचे काम सुरू आहे. हे काम एपी अॅण्ड जेपी कंपनीला देण्यात आले आहे. चिमूर-वरोरा मार्गावर मोठ्या प्रमाणात पाईप ठेवण्यात आल्या आहेत. गणेश वाल्मिक नौताम हा शेळी चारण्यासाठी खडसंगी येथील कब्रस्तान परिसरात गेला होता. त्यावेळी पाईप गणेशच्या अंगावर पडले. यात चिरडून त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह ग्रामस्थ व पोलिसांनी मिळून पाईपखालून काढला आणि शवविच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.