चंद्रपूर- जंगलालगत असलेल्या वांझोट्या जमिनीवर काबाडकष्ट करुन मशागत केली. जमिनीत घाम गाळून तिला पिकवण्यायोग्य करण्यासाठी त्यांच्या पिढ्यांन पिढ्या झिजल्या. मात्र, अजूनही या काळ्या आईच्या लेकरांना उपऱ्यासारखेच जीवन जगावे लागत आहे. ही व्यथा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील अनिल लटारी गोयलसारख्या अनेक शेतकऱ्यांची...ज्यांनी या जमिनीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले... त्याच व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय 'ईटीव्ही भारत'ने बळीराजा सोबत एक दिवस.. या उपक्रमातून..
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावातील बेघर वस्तीला लागूनच जंगल आहे. जे धाबा वन विकास महामंडळाच्या अखत्यारीत येते. येथील झुडपी आणि दलदलीच्या जमिनीला लटारी गोयल यांनी काबाड कष्ट करून शेती योग्य केली. त्यावर धानाचे पीक घ्यायला सुरुवातही केली. मात्र, त्यांच्यासाठी जमीन कसणे म्हणजे 'ईकडे आड, तिकडे विहीर' अशीच होती. एकीकडे वनविभागाचे कर्मचारीही जमीन वनविभागाची असल्याचे सांगत पीक घेण्यास मज्जाव करायचे, तर दुसरीकडे वन्यजीव पीक फस्त करायचे... या संघर्षातच लटारी गोयल यांची हयात गेली आणि 2004 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.